देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकांच्या विकासाला साह्यकारी होऊ शकतील, अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत. त्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे येथे आयोजित 21 व्या पदवी प्रदान समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, प्र-कुलगुरू विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आज मुले आणि मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. नारीशक्तीचा विकास हा देशवासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे. पदवी प्रदान सोहळ्यात सुवर्णपदकप्राप्त 11 विद्यार्थ्यांपैकी 8 मुली असल्यावरून मुलींच्या शिक्षणासाठीही येथे योग्य वातावरण आणि सुविधा दिल्या जातात, असे दिसून येते. मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना केले.
मुर्मू पुढे म्हणाल्या, अनेक वर्षांच्या संशोधनामुळे नवीन शोध आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन उपाय शोधले जातात. भारतातील संशोधक विद्यार्थी केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या समस्यांवर उपाय शोधू शकतात. तुम्ही विद्यार्थी आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि ज्ञानाने देश-विदेशातील मोठ्या संस्था आणि इतर लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकता. नवकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगद्वारे व्यवस्थापन, आरोग्यसेवा, विधी, सामाजिक विज्ञान आणि अन्य क्षेत्रांत प्रभावी योगदान देऊ शकता. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडियाद्वारे आपली ध्येये साध्य करण्यासाठी मदत होईल. केवळ आपल्या उपजीविकेचा आणि कुटुंबाचा विचार न करता वसुधैव कुटुंबकम् या अर्थाने संपूर्ण जगाचा विचार करावा, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आदी उपस्थित होते.
देश-विदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी करावा. गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आणि अन्य कारणांमुळे समाजाच्या परिघाबाहेर जगणार्या लोकांचाही विचार करावा, असे आवाहन राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या वेळी केले. बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंगसारखे क्षेत्र उदयास येत असून, यामुळे अनेक नोकर्या कालबाह्य ठरतील. तथापि, त्यामुळे अनेक नवीन रोजगारही निर्माण होणार असून, या क्षेत्राचे ज्ञान घेणार्या विद्यार्थ्यांना निश्चितच नवीन संधींचा लाभ होणार आहे, असेही राज्यपाल म्हणाले.