Fish  Pudhari
रायगड

Alibag Fish Finder Problem: ताज्या मासळीचे दर तिप्पट; हवामान बदलाचा फटका

अलिबाग किनारपट्टीवर मच्छीमार हवालदिल; सोनार यंत्रणा निष्क्रिय, बाजारात ताज्या मासळीचा तुटवडा

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

समुद्रातील ताज्या मासळीला सध्या प्रचंड मागणी असली तरी बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. पहाटे गारठा आणि दुपारनंतर झपाट्याने वाढणारे तापमान असे विचित्र वातावरण सध्या अनुभवास येत असून, या चढउतारामुळे समुद्रातील मासळीची ठिकाणे शोधणे मच्छीमारांसाठी कठीण झाले आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासळी न मिळाल्याने खाली हात परतावे लागत आहे.

हवामानातील बदलांचा फटका थेट तंत्रज्ञानालाही बसत आहे. मासे शोधण्यासाठी वापरले जाणारे ‌‘फिश फाइंडर‌’ किंवा ‌‘इको साउंडर‌’सारखी सोनार तंत्रज्ञानावर आधारित उपकरणेही अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे मच्छीमार सांगतात. तापमानातील अचानक बदलामुळे मासे आपली ठिकाणे बदलत असल्याने रडारवर अचूक नोंद मिळत नाही, याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. ताज्या मासळीचे दर सध्या तिप्पट वाढले असून सुरमय, पापलेट, कोळंबी यांसारखी लोकप्रिय मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. काही दिवसांपूर्वी चार पापलेट साधारण 400 रुपयांना मिळत असत; मात्र त्याच आकाराचे पापलेट सध्या 1,200 रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

तापमानात चढ-उतार

नवगाव येथील मच्छीमार साईनाथ पावसे यांनी सांगितले की, एकाच दिवसात तापमानात मोठे चढउतार होत आहेत. सकाळी तापमान 23 अंश सेल्सिअसपर्यंत असते, तर दुपारनंतर ते 30 अंशांपर्यंत वाढते. यामुळे समुद्रातील मासे आपली ठिकाणे बदलतात. अद्ययावत रडार यंत्रणेवर आधारित फिश फाइंडर यंत्रालाही माशांची ठिकाणे शोधणे अवघड होते. तसेच पौर्णिमेनंतर दशमीपर्यंत भांगाची भरती असल्यानेही मासेमारीवर परिणाम होत आहे. मात्र चार ते पाच दिवसांत परिस्थिती बदलल्यानंतर मासळी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

स्थानिक बाजारात तुटवडा

ताज्या मासळीला मोठी मागणी असल्याने बंदरात आलेली मासळी लिलावात हातोहात विकली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळी शिल्लक राहत नसल्याचे मासळी विक्रेत्या संगिता पेरेकर यांनी सांगितले. सद्याच्या हंगामात जवळा, कोळंबी, माकुल अशी मासळी मिळते. या मासळीला लिलावात जास्त मागणी नसल्याने ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते, तर पापलेट, सुरमय या सारखे प्रकार स्थानिक बाजारात विक्रीसाठी शिल्लकच रहात नाहीत. एकूणच हवामानातील अस्थिरतेमुळे मच्छीमार आणि ग्राहक दोघांनाही सध्या महागाईचा सामना करावा लागत आहे.

मासेमारीला गेल्यानंतर डिझेल खर्च, नोकरांचा पगार, त्यांच्या जेवणाचा एका फेरीचा खर्च लाखापेक्षा जास्त होतो. हा खर्च भागेल इतकीही मासळी मिळत नसल्याने आम्ही नौका बंदरात नांगरुन ठेवल्या आहेत.
संजय डबरी, मच्छीमार
मासळी मिळत नसल्याची अनेक कारणे आहेत, यातील बेकायदेशीर आणि बंदी कालावधीत होणारी मासेमारीही तितकीच कारणीभूत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
अनंत चोगले, मच्छीमार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT