‘शेतीत मेहनत आहे, पण त्याचे फळही लवकर मिळते‌’ pudhari photo
रायगड

Alibag agriculture‌ : ‘शेतीत मेहनत आहे, पण त्याचे फळही लवकर मिळते‌’

अलिबागचे तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे न जाता गावातच राहून वळलेत शेती व्यवसायाकडे

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाला उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळण्यास सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यातील विविध गावांमध्ये पहाटेपासूनच शेतात मशागत करताना शेतकरी दिसून येत असून, भाजीपाला शेतीला चांगले दिवस येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या शेतीप्रकाराकडे तरुण पिढीचा कल लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.

भाजीपाला पिकांना तुलनेने कमी कालावधीत उत्पादन मिळते आणि बाजारात त्यांना सातत्याने मागणी असते. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून ही शेती अधिक फायदेशीर ठरत आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, काकडी, दोडका, कारली यांसारख्या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. काही शेतकरी फुलकोबी, कोबी, फ्लॉवर, मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांचीदेखील लागवड करत आहेत.

अलिबाग तालुक्यातील हवामान आणि जमिनीचा कस भाजीपाला शेतीसाठी पोषक असल्याने उत्पादन चांगले येत आहे. सकाळी लवकर शेतात जाऊन नांगरणी, खत टाकणे, रोपांची लागवड, पाणी व्यवस्थापन यासारखी कामे शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने करताना दिसतात. काही शेतकरी ठिबक सिंचन, मल्चिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करण्याचा आणि उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तरुण शेतकरी केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता थेट बाजारपेठेशी जोडले जात आहेत. अलिबाग, मुरूड, पेण तसेच मुंबई बाजारपेठेत थेट भाजीपाला विक्री करून मध्यस्थांचा खर्च टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत असून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

काही तरुणांनी नोकरीच्या शोधात शहराकडे न जाता गावातच राहून शेती व्यवसाय सुरू केला आहे. “भाजीपाला शेतीत मेहनत आहे, पण त्याचे फळही लवकर मिळते,” असे मत अनेक तरुण शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून बियाणे, खत, सिंचन यासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा देखील शेतकरी लाभ घेत आहेत.

एकूणच अलिबाग तालुक्यात भाजीपाला शेती फुलताना दिसत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ही शेती नवा आशेचा किरण ठरत आहे. योग्य मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भविष्यात भाजीपाला उत्पादनात आणखी वाढ होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

भाज्यांची लागवड

शेतीकडे तरुण पिढीचा कल वाढतअसून,टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, काकडी, दोडका, कारली,फुलकोबी, कोबी, फ्लॉवर, मेथी, पालक यांसारख्या भाज्यांची लागवड केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT