रमेश कांबळे
अलिबाग: अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भागातील स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने त्या वेळी संबंधित ठिकाणी कोणताही रुग्ण, नातेवाईक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिव्हील रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयातील इमारतींची नियमित संरचनात्मक तपासणी, दुरुस्ती आणि सुरक्षिततेची उपाययोजना वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, या घटनेमुळे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये निष्काळजीपणा झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी केल्याची माहिती मिळत आहे. स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपासणीनंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. दरम्यान, रुग्णालयातील इतर भागही सुरक्षित आहेत का, याची तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने शासकीय रुग्णालयांच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
यंत्रणेच्या इमारत देखभालीवर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातच अशा प्रकारची घटना घडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित भागात त्यावेळी रुग्ण किंवा कर्मचारी उपस्थित असते, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.