Bribery Case Pudhari
रायगड

Alibag Bribery Case: सामाजिक संस्थेच्या नोंदणीसाठी मागितली लाच; अलिबागमधील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लघुलेखकाविरुद्ध गुन्हा

यावेळी म्हात्रे यांनी त्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: सामाजिक संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील लघुलेखकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संतोष माणिक म्हात्रे (वय ५०), लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, अलिबाग, असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.

२१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने सामाजिक संस्थेची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्याबाबत आरोपी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी म्हात्रे यांनी त्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३५ ते २.४० या वेळेत पंचासमक्ष मोबाईल फोनवर पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तसेच ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ४.३० ते ५ या वेळेत धर्मादाय आयुक्त कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, आरोपीला कारवाईचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. या प्रकरणी ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.२४ वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. घरझडतीही घेण्यात आलेली नाही.

या कारवाईचे पडताळणी अधिकारी पोलीस निरीक्षक निशांत धनवडे असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी केले. पोलीस नाईक नारायण सरोदे, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर आणि महिला पोलीस शिपाई मोनाली पाटील यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

लाच मागितल्यास करा एसीबीकडे संपर्क

कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड घटक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१, व्हॉट्सॲप क्रमांक ८०८७८२१०६४ असून टोल फ्री क्रमांक १०६४ वरही तक्रार करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT