Alibaug News Pudhari
रायगड

ATV Illegal Tourism: अलिबाग किनाऱ्यावर बेकायदेशीर एटीव्ही गाड्या सुरूच

अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय; सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष; पर्यटकांच्या जीवितास धोका

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी असणाऱ्या एटीव्ही वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहने बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे सांगितले जाते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एटीव्ही वाहनांवर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना सविस्तर पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या पत्रानुसार, सन 2021 मध्ये सावंत यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने अलिबाग व श्रीवर्धन येथील प्रांत अधिकाऱ्यांना बेकायदेशीर एटीव्ही वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्राधिकृत केले होते. मात्र, त्या आदेशानंतरही प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

17 एप्रिल 2026 पर्यंतची स्थिती पाहता, अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ही एटीव्ही वाहने अजूनही बिनधास्तपणे व बेदरकारपणे सुरू असल्याचे सावंत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही वाहने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच कोणतेही सुरक्षा नियम न पाळता चालवली जात असल्याने पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.

याशिवाय, या वाहनांमुळे समुद्र किनाऱ्याच्या नैसर्गिक पर्यावरणालाही हानी पोहोचत असल्याचा मुद्दा पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने 2021 मधील आदेशांची अंमलबजावणी का केली नाही, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले का, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासन आता कोणती ठोस कारवाई करते, याकडे स्थानिक नागरिक व पर्यटकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बेकायदेशीर एटीव्ही व्यवसायामुळे किनाऱ्यावरील सुरक्षितता आणि पर्यावरण या दोन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यावर तातडीने निर्णय होण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या

अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर एटीव्ही वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. संबंधित प्रांत अधिकारी व यंत्रणांच्या निष्क्रियतेची चौकशी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट व कडक नियमावली लागू करण्यात यावी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT