पोलादपूर : तालुक्यातील महत्त्वाकांक्षी देवळे धरण प्रकल्पाच्या कामाची राज्याचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रत्यक्ष स्थळावर 3 मे रोजी सायंकाळी उशिरा जाऊन सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याच्या तसेच गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
देवळे, करंजे, नाणेघोळ, पितळवाडी, चाळीचा कोंड, वाकण, घागरकोंड अशा डोंगराळ भागातील गावांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा भासत होता. विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवळे धरण प्रकल्प दुरुस्ती अंतर्गत नव्याने राबविण्यात येत आहे. या धरणामुळे नदीकाठी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे बळकटीकरण होणार असून पाणी साठवण क्षमता वाढेल. परिणामी, संपूर्ण परिसरातील सुमारे १० ते १५ गावांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, “या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. देवळे धरण पूर्ण झाल्यानंतर या डोंगराळ पट्ट्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेतीला देखील चालना मिळेल.”
या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा असून, पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. प्रशासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा देण्याचा निर्धार मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेची अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार ,पंचायत समिती सदस्य अनिल दळवी , तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे आदी मान्यवर सह ग्रामस्थ उपस्थित होते