अलिबाग: अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे एका ४२ वर्षीय महिलेच्या खून-प्रकरणी अलिबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) व भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत महिला आणि आरोपी निलेश एकनाथ घासे (रा. नवेदर नवगाव, ता. अलिबाग) यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.
या संबंधांमुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित महिला आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपीच्या घरी राहत होती. १२ जून २०२६ रोजी महिलेचे तिच्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर ती आरोपीच्या घरी गेली होती.
त्यावेळी झालेल्या वादातून आरोपीने तिच्यावर जीवघेणा हल्ला करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेची मुलगी जय जगदीश पाटील हिने फिर्याद दिली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र चौक-शीदरम्यान खुनाचा संशय बळावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.