महिनाभरात मंत्रालयाशी संबंधित तिघांना लाच घेताना अटक करण्यात आली. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर 13 मार्चला कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक मिनाक्षी उन्हाळे यांना अडीच लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते.
पनवेल: मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला लाच प्रकरणी गेल्या महिन्यात अटक केल्याची घटना ताजी असताना आता मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख 37 हजार रुपये घेताना नवी मुंबईतील खारघर परिसरात रंगेहाथ पकडले आहे.
यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकारी लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठी रक्कम मागितली होती. शासकीय काम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली होती. त्यानुसार खारघर परिसरात लाचेची रक्कम घेण्यासाठी लाड आला असता एसीबीच्या सापळ्यात तो अडकला.
फडणवीसांचा पुन्हा दणका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे मंत्रालयातील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पुन्हा देण्यात आला आहे.