लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवला  pudhari photo
रायगड

Aaditya Thackeray | आता विधानसभा निवडणुकीतही गद्दारांना धडा शिकवायचा

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : लोकसभा निवडणुकीत गद्दारांना आपण धडा शिकवला आहे आणि आता विधानसभेत पण शिकवायचा आहे. 400 पारची हवा उठवणारी भाजप सुरुवातीला स्वतःच नाव घेत होती ते आता एनडीए बोलत आहेत. संविधान बदलायला निघालेले त्यांना देशातील नागरिकांनी धडा दिला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथे केली. शिवसेना ठाकरे गटाच्या संवाद दौर्‍याची कर्जतमधून सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसैनिकांना ठाकरे हे संबोधित करत होते.

कर्जत तालुक्यात 16 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहराजवळील किरवली येथील साईकृपा शेळके मंगल कार्यालय येथे ही बैठक पार पडली यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते सचिन आहिर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर तथा महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत, माजी पक्ष प्रतोद भाई शिंदे, जेष्ठ नेते रियाज बूबेरे, उपतालुकाप्रमुख दशरथ भगत, तालुका संघटक बाबू घारे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांना मानणारे आपण आहोत म्हणूनच हा विजय देशाचा आहे. भाजपला आपण संविधान बदलण्यापासून रोखले आहे. केंद्रात त्यांचे सरकार असले तरी ते मित्रपक्षांवर आहे. तेव्हा खेळ कधीही बदलू शकतो, देशात इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

आभार मानायला आलो

लोकसभा निवडणुकीत कठीण परिस्थितीत आपण लढलात आणि जिंकलात त्याचे आभार मानायला मी येथे आलो आहे. घरी शंकराचार्य हे भेटीसाठी घरी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, धर्मात सगळ्यात मोठे पाप हे विश्वासघात आहे. लोकसभेत त्या गद्दारांना आपण धडा शिकवला आहे आणि आता विधानसभेत पण शिकवायचा आहे. त्या गद्दारांना आता गाडायचे आहे. इतक्या दिवसात महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिम्मत झाली नाही. त्यांना माहीत आहे आपल्याला जनमत मिळणार नाही कारण लोकांच्या मनात आता महाविकास आघाडी आहे. तर उध्दव ठाकरे वर्षा बंगला सोडत असताना येथील शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होते. आम्ही तयार आहोत या मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवू. येथे अद्यावत कुठलीही आरोग्य सुविधा उपलब्ध नाही, येथे 3 महिने आपण टँकरने पाणी पुरवलं, पाणी टंचाईची मोठी समस्या आहे, येथे रस्ते आणि लाईटच्या त्याच गोष्टी सांगून निवडणूक लढवली जाते. लोकसभेच्या निवडणुकीच्या समोर मोठी धनशक्ती होती. मात्र आपल्याकडे होता तो प्रामाणिक शिवसैनिक त्यावरच या मतदारसंघात आपण 18 हजारांचे मताधिक्य घेतले, असे भावनिक विधान उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केले.

हवेत राहू नका

आता हवेत राहू नका आता, जोमाने कामाला लागा. लोकसभेत आपल्याला या मतदारसंघात यश मिळाले नसले तरी आता त्याचा वचपा काढायचा आहे. ज्यांना लहानाचे मोठे केले त्यांनीच त्रास दिला. आज जे आमदार आहेत त्यांची कुवत होती का आमदार होण्याची ते केवळ पक्षांमुळे आमदार झाले मात्र तेच पक्षाला सोडून गेले. फोकस्कोन सारखा प्रकल्प येथून जाताना येथील खासदार हे तोंडात बोटे घालून बसले होते. कर्जतमधून या संवाद दौर्‍याची सुरुवात झाली आहे. निष्ठावान शिवसैनिकांसोबत आपला पक्ष असेल असे प्रतिपादन शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी यावेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT