रोहा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारण्यात आला असून रोह्यात हजारो कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. गगणभेदी घोषणा देत भर उन्हात मोर्चा काढून शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली ताकत दाखवली. कर्मचारी यांनी केलेल्या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालये रिकामी दिसली.
'आमदार -खासदार तुपाशी, सरकारी कर्मचारी उपाशी', 'एकच मिशन जुनी पेन्शन', 'सरकार हिलायेंगे, पेन्शन बचायेंगे' अशा घोषणा देत हजारो शासकीय कर्मचारी काम बंद करून मोर्चा काढला. राज्यव्यापी संपाला सर्वानी पाठिंबा देत आणि सहभागी होत आपला एल्गार राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवला. रोहा पंचायत समिती आवारात रोहा तालुक्यातील शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चासाठी सकाळी दहा वाजता जमण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर साडेदहाच्या सुमारास 'एकच मिशन, जुनी पेन्शन' घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणांचे फलक हाती घेत हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. रोहा पंचायत समिती दमखाडी नाका, नगरपरिषद, रोहा बस स्थानक ते तहसील कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर विविध घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.
मोर्चाच्या सुरुवातीला योजना लागू करावी यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. परंतु, सरकार जुन्या पेन्शनबाबत उदासीन दिसून आले. त्यामुळे लोकशाहीमधील शेवटचे हत्यार संप पुकारून आम्ही जन आक्रोशच्या माध्यमातून सरकारला राज्यभरातून ताकद दाखवत आहोत. आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना ही प्रमुख मागणी आमची आहे असे यावेळी मोर्चकऱ्यांनी मत व्यक्त केले.
या मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, वन, पाटबंधारे, सामाजिक वनिकरण, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचाय सदस्य सहभागी झाले होते.
हेही वाचा :