रायगड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. या पाहणी दौर्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी महामार्गावरील पेण येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंड दाखवून कामाच्या दिरंगाईबाबत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणार्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली अनेक वर्षे काम रखडले आहे. शिवाय आता काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना महामार्गावरील खड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. यामुळे वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. महामार्गाचे कामाला गती मिळावी. गणेशोत्सवात नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौर्याचे सोमवारी (26 ऑगस्ट) आयोजन करण्यात आले होते.
दहा दिवसांवर गणेशोत्सव असताना मुख्यमंत्र्यांना जाग आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवारी दुपारी महामार्गावरील पेण-वाशी येथे महामार्गाची पहाणी करणार्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना उबाठा गटाचे संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, अलिबाग-पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. रात्री या आंदोलकांना सोडून देण्यात आले.
पेण पोलीस ठाणे हद्दीत 26 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे तीन वाजता वाशीनाका पेण येथे महींद्रा शोरूमचे बाजूला मुंबई गोवा हायवे रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा कार्यक्रम दरम्यान रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचा गैरकायदयाची मंडळी जमा न करणेबाबतचा मनाई आदेश असताना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे 7 आरोपीत सर्व रा. पेण यांनी जिल्हाधिकारी अलिबाग यांचे जमावबंदी आदेशाचा भंग करून गैरकायदयाची मंडळी जमवून मुंबई गोवा हायवे रोडलगत वाशी नाक्याजवळ महींद्रा शोरूमचे जवळ हातात काळे झेंडे घेवून घोषणा दिल्या. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि निलेश राजपूत हे करीत आहेत.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचा गैरकायदयाची मंडळी जमा न करणेबाबतचा मनाई आदेश असताना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे 7 आरोपीत सर्व रा. पेण यांनी जिल्हाधिकारी अलिबाग यांचे जमावबंदी आदेशाचा भंग केला.