Crime pudhari
रायगड

Uran Fraud Case : तारण ठेवलेले 55 लाखांचे सोने लुबाडले

उरणमध्ये मारुती ज्वेलर्सच्या मालकांसह तिघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उरण : सोने तारण ठेवून घेतलेले लाखो रुपयांचे दागिने परत न करता तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारक उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारुती ज्वेलर्सचे मालक नथुसिंग चंदना, त्यांचे वडील भेरूनाथ चंदना आणि त्यांचे व्यावसायिक मित्र निलेश मेहता यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

उरणमधील गणेश नगर भागात राहणारे आणि आयुश कंस्ट्रक्शन नावाने सिव्हील कामे करणारे व्यावसायिक युवराज प्रताप पाटील (वय 42) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कामासाठी पैशांची आवश्यकता असल्याने पाटील यांनी 1 फेब्रुवारी 2022 ते 29 मार्च 2023 या कालावधीत उरण येथील मारुती ज्वेलर्समध्ये विश्वासाने एकूण 595.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. त्याबदल्यात त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 17,35,000 रुपये उचलले होते.

नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा पाटील यांनी व्याजासह पैसे परत करून आपले दागिने मागितले, तेव्हा नथुसिंगने दागिने निलेश मेहता यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर “निलेश मेहता यांच्या आईचे निधन झाले असून दागिने बँकेच्या लॉकरमध्ये अडकले आहेत, वारस दाखल्याशिवाय ते मिळणार नाहीत“ अशी वेगवेगळी बहाणेबाजी करून वेळ मारून नेण्यात आली.

फेब्रुवारी 2025 मध्ये पाटील यांच्या घरात लग्न असल्याने त्यांनी दागिन्यांसाठी तगादा लावला. त्यानंतर झालेल्या एका बैठकीत आरोपी निलेश मेहता याने पाटील यांच्याकडून मूळ पावत्या स्वतःकडे घेतल्या आणि आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. 5 लाख रुपये दिल्यास 30 तोळे सोने बनवून देतो, असे आश्वासन त्याने दिले होते. मात्र, त्याने 30 तोळ्यांऐवजी केवळ 10 तोळ्यांचे (100 ग्रॅम) दागिने परत केले आणि उर्वरित दागिने देण्यास टाळाटाळ केली.

अनेक महिने उलटूनही उर्वरित 495.20 ग्रॅम सोने परत न मिळाल्याने आणि आरोपी कोणताही प्रतिसाद न देता थेट राजस्थान येथे निघून गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. तिन्ही आरोपींनी संगणमत करून आपली सुमारे 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT