Monkey Fever Pudhari
रायगड

Monkey Fever: सिंधुदुर्गात 'माकड तापा'चा विळखा; लक्षणे काय, नागरिकांनी काय करू नये?

मृतावस्थेत आढळलेली माकडे आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्रशासनाने या भागाला 'पब्लिक हेल्थ अलर्ट' घोषित केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: कोकणच्या निसर्गरम्य पट्ट्यात उन्हाच्या झळांसोबतच आता 'माकड ताप' अर्थात क्यासनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) या जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा आणि दोडामार्ग परिसरात गेल्या काही दिवसांत ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळलेली माकडे आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्रशासनाने या भागाला 'पब्लिक हेल्थ अलर्ट' घोषित केले आहे.

रुग्णसंख्या आणि सद्यस्थिती

आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार,बांदा आणि दोडामार्ग तालुक्यात एकूण ५ बाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचाहीसमावेश आहे. ५ रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.दरम्यान १८ संशयीत रुग्णांचे रक्त नमुने तपासणी अंती निगेटिव्ह आले आहेत.

माकडांचा मृत्यू आणि संसर्गाचा धोका

दरम्यान याच कालावधीत स्थानिक काजू बागायतींमध्ये ६ माकडे मृतावस्थेत आढळली आहेत. माकड ताप हा प्रामुख्याने 'फ्लॅव्ही व्हायरस' गटातील विषाणू असून, तो जंगलातील गोचिडींमार्फत माकडांकडून मानवाकडे संक्रमित होतो. उन्हाळ्यात पाण्यासाठी माकडे मानवी वस्तीकडे धाव घेतात, ज्यामुळे या आजाराचा प्रसार वाढण्याची भीती सिंधुदूर्ग जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासकीय पावले: एनआयव्हीचे पथक दाखल

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) विशेष पथक बांदा परिसरात दाखल झाले आहे. हे पथक परिसरातील गोचीड गोळा करून त्यांच्यातील विषाणूच्या प्रादुर्भावाची शास्त्रीय तपासणी करत आहे. आरोग्य आणि वन विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून बांदा-दोडामार्ग या गोवा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

माकड ताप: लक्षणे आणि प्रसार

माकड ताप हा आजार प्रामुख्याने आजारी किंवा मृत माकडांवरील गोचीड वा पिसवा चावल्याने होतो. या आजाराच्या मुख्य लक्षणांमध्ये, अचानक येणारा तीव्र ताप आणि डोकेदुखी, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे. उलट्या, अतिसार आणि गंभीर परिस्थितीत नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्त्राव अशी आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाची खबरदारी

आरोग्य विभागाने नागरिकांना खालील नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

काय करावे? / काय करू नये?

१.जंगलात किंवा बागेत जाताना अंग झाकणारे पूर्ण कपडे आणि बूट वापरावेत.जंगलात किंवा बागेत उघड्या अंगाने फिरू नये.

२.गोचीड प्रतिबंधक रसायनांचा (रिपेलन्ट) वापर करावा. कोठेही मृत माकड आढळल्यास त्यास स्पर्श करू नये.

३.संशयास्पद लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती किंवा गावरान उपचारांवर अवलंबून राहू नये.

४.मृत माकड दिसल्यास वन विभाग किंवा आरोग्य केंद्राला त्वरित कळवावे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

माकड ताप, ज्याला क्यासनूर फॉरेस्ट डिसीज म्हणतात, हा जंगलातील गोचीडांमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने माकडांपासून मानवांत पसरतो. नोव्हेंबर ते मार्च या काळात जास्त सक्रिय होणारा हा आजार अचानक उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी आणि रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दाखवतो. आजारी किंवा मृत माकडांच्या शरीरावरील पिसवा वा गोचीड चावल्याने हा आजार होतो. जंगलात जाताना अंगावर पूर्ण कपडे घालणे, गोचीड प्रतिबंधक रसायनांचा वापर करणे आणि या रोगावर लस उपलब्ध आहे, ती घेणे महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
-डॉ. सचिन जायभाये, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ.,मुक्ता क्लिनिक अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT