गेल्या पाच वर्षात कोकणात आढळले लेप्टोचे 355 रुग्ण file photo
रायगड

Leptospirosis cases Konkan : गेल्या पाच वर्षात कोकणात आढळले लेप्टोचे 355 रुग्ण

20 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण रायगड जिल्ह्यात, भाताचे पिक घेणार्‍या भागात लेप्टोची भीती

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः किशोर सुद

कोकणात लेप्टोस्पायरोसिस या जिवघेण्या आजाराचा धोका कमी झालेला नाही. शेती आणि सांडपाण्याशी निगडीत काम करणार्‍यांना लेप्टोची लागण झालेली आढळते. कोकणातील पाच जिल्हयांमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये लेप्टोचे 355 रुग्ण आढळून आहे आहेत. सर्वाधिक रुग्ण हे रायगड जिल्हयात आहेत. कोकणातील 355 रुग्णांपैकी एकटया रायगड जिल्हयात 267 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच वर्षात कोकणात लेप्टोमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोकणात लेप्टोबाबत प्रतिबंधात्मक उपोययोजना व जनजागृतीची आवश्यकता आहे.

कोकण विभागातील समुद्र किनारपट्यालगतच्या भागात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण विशेष करून आढळतात. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हयात या आजाराचे रुग्ण आढळून येतात. भाताचे पिक घेणार्‍या भागात लेप्टोचे रुग्ण आढळून येतात. हा एक तापाचा आजार आहे. उंदीर, डुक्कर व कुत्रा या प्राण्यात हा आजार नेहमी आढळतो. आजार झालेल्या प्राण्यांच्या लघवीत यांचे जंतू असतात.

सांडपाण्यात हे जंतू बरेच दिवस तग धरू शकतात. या संसर्गबाधित प्राण्यांच्या लघवीचा किंवा दूषित सांडपाण्याचा त्वचेशी किंवा तोंडावाटे संबंध आला तर माणसालाही हा संसर्ग होऊ शकतो. मात्र त्वचेतून प्रवेश करण्यासाठी त्यावर जखम किंवा ओरखडे असले तरच संसर्ग होऊ शकतो. कुत्रा, उंदीर, डुकरे यांच्याशी संबंध येणार्‍या लोकांशी हा आजार होतो. खेडयांमध्ये म्हणूनच याचा प्रादुर्भाव जास्त असतो. शहरी भागात, जिथे स्वच्छता कमी आहे अशा झोपडपट्टयात रुग्ण आढळू शकतात. सांडपाण्यात काम करणार्‍या कामगारांनाही हा आजार होऊ शकतो. पावसाळयात डबक्यांमुळे, पावसाळयात गटारीचे पाणी इतर पाण्यात मिसळले तर संसर्ग होऊ शकतो.

लेप्टो संसर्ग झाल्यापासून एक-दोन आठवडयात रक्तामध्ये हे जंतू पसरतात. यानंतर ते यकृत, मूत्रपिंडे, डोळा, इ.अवयवांत आश्रय घेतात. त्यामुळे लक्षणे बहुधा या अवयवांशी संबंधित असतात. आजाराच्या सुरुवातीला सौम्य आजार असल्यास ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगदुखी, घसासूज, खोकला, इत्यादी त्रास होतो. तीव्र आजार झाल्यास यकृतसूज, कावीळ, उलटया, त्वचेवर पुरळ, लघवीत रक्त उतरणे, खोकल्यातून रक्त येणे, न्यूमोनिया, इ. त्रास होऊ शकतो. त्यानंतर गंभीर लक्षणे उद्भवतात.

हा आजार तीन ते सहा आठवडे चालतो व उपचार न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे लेप्टोच्या रुग्णाला रुग्णालयात ठेवून शुश्रुषा करणे आवश्यक असते. या आजाराच्या प्रतिबंधासाठी डुकरे, मोकाट कुत्री, उंदीर यांचा बंदोबस्त केल्यामुळे एकूण रोगाला आळा बसतो. शेतीची कामे, साफसफाई कर्मचार्‍यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोकणात गेल्या पाच वर्षात 355 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रायगड जिल्हयात 267 रुग्ण आढळून आले आहेत तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हयात पाच वर्षात 35 रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हयात 9 रुग्ण आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 44 रुग्ण आढळून आले असून तिघांचामृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्हयातील लेप्टोच्या रुग्णांची नोंद उपलब्ध नाही.

नियंत्रण उपाययोजना

लेप्टो प्रभावी पाचही जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आरोग्य कर्मचान्यांचा आठवडी गृहभेटीचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यानुसार नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये लेप्टो निदानाची व्यवस्था संशयित लेप्टो रुग्णाचे निदान विनाविलंब होऊन त्याला उपचार वेळेवर सुरू व्हावा याकरिता लेप्टो प्रभावित जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रॅपिड डायग्नोस्टिक किटची व्यवस्था करण्यात आली आहे.

लेप्टोच्या रुग्णांची आकडेवारी

ठाणे - 35

रायगड- 267

पालघर- 9

सिंधुदुर्ग- 44

रत्नागिरी- 0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT