वायू, ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर : 34 प्रकल्पांच्या बांधकामांना स्थगिती pudhari photo
रायगड

Environmental rules violation : वायू,ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर : 34 प्रकल्पांच्या बांधकामांना स्थगिती

पनवेल मनपाचा आक्रमक पवित्रा : बांधकाम व्यावसायिकांचे दणाणले धाबे

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली. स्थळपाहणी अहवालानुसार एकूण 34 बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे. हायकोर्टाचे आदेश तसेच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर कारवाई करण्यात आली.

यापूर्वी महापालिकेतर्फे एकूण 169 बांधकाम प्रकल्पांना उपाययोजना करणेबाबत अथवा काम बंद करणेबाबाबत इशारावजा नोटीस देण्यात आली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावूनही काहींनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली.

यावेळी अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या.या अनुषंगाने विभागनिहाय कारवाई करण्यात आली. कळंबोली विभाग 10 बांधकाम प्रकल्प,कामोठे विभाग 9 प्रकल्प,नवीन पनवेल / पनवेल विभाग 15 बांधकाम प्रकल्प अशाप्रकारे एकूण 34 बांधकाम प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान संबंधितांना तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महापालिका कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बांधकामस्थळांनी पूर्तता न केलेल्या बाबी

  • विकासकांनी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान 25 फूट उंचीचे धातूचे पत्रे लावण्यात आल्याचे दिसून आले नाही.

  • बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या तागाच्या कापडाने / ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आल्याचे दिसून आले नाही.

  • बांधकामच्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर / स्मॉग गनद्वारे सतत फवारणी करण्यात आल्याचे दिसले नाही.

  • बांधकाम जागेवरील हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या भंगार / पाडकाम साहित्यावर पाणी शिंपडण्यात आले नाही.

  • बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूंनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, याची दक्षता घेतली नाही.

  • बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

  • बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक असेल, प्रदूषणाची पातळी ओलांडणार नाही याबाबत उपाययोजना केल्या नाहीत.

  • बांधकामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रीलिंग, सोईंग आणि ट्रिमिंगची कामे बंदिस्त भागात करावी व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरून सतत फॉगिंग केले आले नाही.

  • बांधकामाच्या ठिकाणी असणारी माती, वाळू, बांधकाम साहित्य हे बंदिस्त भागामध्ये साठवल्याचे दिसले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT