पनवेल : विक्रम बाबर
हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लेडीज डब्यात बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या 50 वर्षीय प्रवाशाने हा अमानुष प्रकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे.
श्वेता महाडिक असे जखमी विद्यार्थिनीचे नाव असून ती पनवेल परिसरात राहते. श्वेता ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळच्या वेळेस लोकलने प्रवास करत होती. लोकल पनवेल स्थानक सोडून खांदेश्वरच्या दिशेने जात असताना लेडीज डब्यात शेख अख्तर नवाज शेख (वय 50) हा पुरुष प्रवासी बेकायदेशीरपणे चढला. यावेळी डब्यातील महिलांनी त्याला जाब विचारत लेडीज डब्यातून खाली उतरण्याची सूचना केली.
महिलांनी केलेल्या विरोधामुळे आरोपी संतप्त झाला. संतापाच्या भरात त्याने लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता महाडिक हिला जोरात ढकलून थेट धावत्या लोकलमधून बाहेर फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी घाबरून आरडाओरड करत तातडीने लोकलची चेन ओढली. तसेच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पनवेल रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचून लोकल स्थानकात दाखल होताच आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक करण्यात आली. असून आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा महिलांच्या डब्यात प्रवास करणे अश्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला, यावर रेल्वेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कंबरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.