पुणे

स्वारगेट एसटी स्थानकात साचले तळे; प्रवेशद्वारातील पाण्यामुळे प्रवाशांना करावी लागली कसरत

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पहिल्या पावसातच स्वारगेट एसटी स्थानक प्रशासनाच्या कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे. शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे स्वारगेट स्थानकाला तलावाचे स्वरूप आले होते. मोठमोठी डबकी साचल्याने प्रवाशांना दुसर्‍या दिवशी पाऊस नसतानाही बसस्थानकात ये-जा करताना मोठी कसरत करावी लागली.

मान्सूनपूर्व पावसाने पुण्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास पडलेल्या पावसाने स्वारगेट स्थानकाचा चेहरामोहरा बदलून टाकला. शंकरशेठ रस्त्याच्या दिशेने बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर आणि सातारा रस्त्याच्या दिशेने आत प्रवेश करताना मोठी तळी साचली होती. दुसरा दिवस उजाडला तरी येथील पाण्याचा निचरा झाल्याचे दिसले नाही.

किमान गुडघाभर पाणी या परिसरात दुसर्‍या दिवशीही साचल्याचे पाहायला मिळाले. त्यातून मार्ग काढताना प्रवाशांच्या नाकी नऊ आले. मात्र, एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसले. पावसाळापूर्व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पहिल्याच पावसाने असे होत असेल तर संपूर्ण पावसाळ्यात काय होईल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT