पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीकडून किल्ले सिंहगडावर ई-बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन असून, आता पावसाळा संपल्यानंतरच त्याची कार्यवाही होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सिंहगडावर राबविलेल्या या सेवेला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पर्यटकांची पसंती लक्षात घेत, ही सेवा पुन्हा लवकरच सुरू होणार आहे.
पीएमपीने सिंहगडावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ई-बस सेवेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. विरोध इतका होता की, ई-बस दगड मारून फोडण्यात आली. त्यानंतर सिंहगड घाट रस्त्यातील अरुंद वळणावर पीएमपीच्या 9 मीटर लांबीच्या बस व्यवस्थितरीत्या वळण घेत नाहीत. त्यामुळे एक मोठा अपघात होता-होता टळला.
तसेच, ई-चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने बस गतीने चार्ज झाल्या नाहीत. परिणामी, बसगाड्यांची संख्या अपुरी पडली. या सर्व समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागला. मात्र, प्रशासन काही हार मानण्याच्या तयारीत दिसत नाही. प्रशासनाकडून घाट रस्त्यावर पीडब्ल्यूडीच्या सहाय्याने विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. तर महापालिकेच्या सहाय्याने 7 मीटर लांबीच्या 300 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार आहे.
दरवर्षी सिंहगडावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. येथील पाऊस पडल्यानंतर हिरवळ पाहात छोटे छोटे झरे यात खेळण्याचा आनंद पर्यटक घेतात. खर्या अर्थाने सिंहगडाला पावसाळ्यात एक वेगळेच निसर्गसौंदर्य प्राप्त होते. ते पाहण्यासाठी पर्यटकांना स्वत:च्या वाहनानेच जावे लागणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सिंहगडावर सुरू करण्यात आलेल्या ई-बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येथे विविध उपाययोजना केल्यावर पर्यटकांसाठी पावसाळ्यानंतर ई-बस सेवा सुरू करण्यात येईल.
– दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल