पाऊस : मुंबईत पावसाची रिपरिप; वातावरणात गारवा | पुढारी

पाऊस : मुंबईत पावसाची रिपरिप; वातावरणात गारवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबईसह पश्चिम उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना काल (शुक्रवार) रात्री कोसळलेल्या पावसाने दिलासा दिला. तर आज शनिवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. यामुळे सलग दोन दिवस सुरु असलेल्या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसून येत आहेत. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबईसह उपनगरांत विजेच्या कडकडाटात पाऊस कोसळला होता. यामुळे मुंबईसह पुर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचलेले होते. तर शनिवारी मात्र रिपरिप सुरु असल्याने मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी छत्र्या आणि रेनकोट घालून घराबाहेर पडावे लागले. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनाही रेनकोट परिधान करून शाळा गाठावी लागली.

शनिवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या रिपरिप पावसाची कुलाबा फायर स्टेशन येथे २५ मिमी, कुलाबा पंपिंग स्टेशन २२ मिमी, नरिमन पॉईंट फायर स्टेशन येथे १८.०४ मिमी तर उपनगरांतील दिडोंशी फायर स्टेशन येथे २.५४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्तकालीन विभागाने प्रसिध्द केली. एकूण आजच्या पावसाचा सध्या तरी रेल्वे, बस सेवांसह वाहतुकींवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

हे ही वाचलंत का?  

Back to top button