पुणे

सिंहगडाचा कडा कोसळला; पर्यटकांना सावधानतेचा इशारा

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: पावसामुळे सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळील कड्याची दरड कोसळली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याने कल्याण दरवाजा पायी मार्ग बंद झाला आहे.
शनिवारी सकाळी रिमझिम पाऊस पडत असताना मोठी दरड कोसळली. त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरड कोसळताना मोठा आवाज झाला. तेथून काही वेळ आधी कल्याण, मोरदरी वाड्या-वस्त्यांतील विक्रेते गडावर पोहोचले होते.

तसेच काही ट्रेकर्सही तेथून बाजूला गेले होते. पावसाळ्यात कल्याण दरवाजाजवळील कड्याच्या तसेच गडाच्या इतर कड्यांच्या तसेच बुरुजाच्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. तटबंदी, बुरुजाच्या पाऊलवाटा निसरड्या झाल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरड कोसळल्याने कल्याण दरवाजाकडील पायी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गडावर झुणका-भाकरी, दही-ताक अशा खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी येथून ये-जा करणार्‍या स्थानिक विक्रेत्यांची गैरसोय झाली आहे.

कल्याण, मोरदरी आदी खेड्यांतील सिंधुबाई चोरघे, मंदा मोरे, माया मोरे, गोदाबाई डिंबळे आदी महिला, विक्रेते गडाच्या अतिदुर्गम झुंझार बुरुजाच्या मार्गाने सायंकाळी गडाखाली उतरल्या. गडावर शनिवारी "सिंहगड एथिक्स ट्रेक" स्पर्धा आयोजित केली होती. सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कल्याण दरवाजात काही ट्रेकर्स पोहचले, त्यानंतर काही क्षणातच दरड कोसळली. स्पर्धेचे संयोजक नरेश मावानी, संतोष शेळके, हेमंत कांचन तसेच काही विक्रेत्यांच्या समोर दरड कोसळली. त्यामुळे दरवाजाखालून येणार्‍यांना दुसर्‍या पायवाटेने गडावर यावे लागते. घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर म्हणाले, सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण दरवाजाजवळ कड्याचा मोठा भाग कोसळल्याने मोठा आवाज झाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT