नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: सासवड (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील कर्हा नदीवरील विक्रमी वेळेत 40 दिवसांत पूर्ण झालेल्या संत सोपानकाका सेतू या पुलाचे लोकार्पण रविवारी (दि. 26) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होताना पुलावरून मार्गक्रमणाने झाले. या प्रसंगी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, आळंदी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, वारकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेली 15 वर्षे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत होते. या पुलाच्या पूर्णत्वासाठी वारकरी आणि पालखी सोहळ्याच्या वतीने अनेकदा मागणी होत होती. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या वापरात असलेल्या पुलाचे नुकसान झाले होते. त्यामुळे नवीन पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे असल्याने यासाठी आमदार संजय जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पातून 6 कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे यासाठी सहकार्य मिळाले.
अवघ्या 40 दिवसांत रात्रंदिवस काम करून 40 मीटर लांब, 30 मीटर उंच पुलाचे आणि दोन्ही बाजूंनी 200 मीटर भरावाचे काम आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी दिली.
या वेळी आमदार संजय जगताप, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. विकास ढगे, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, माजी नगरसेवक संतोष गिरमे, संभाजी जगताप यांसह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.