बारामती; पुढारी वृत्तसेवा: दर दीड-दोन वर्षाने देशात राज्यात टोमॅटोचे अधिक उत्पादन होते. परिणामी टोमॅटो दर कोसळतात. सध्या टोमॅटो मातीमोल दराने विकावा लागत असल्याचे अधिक उत्पादन हे कारण असल्याचे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी मंत्री पाटील म्हणाले, देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. या पार्श्वभूमीवर आपण लॉकडाऊन शिथिल केला. त्यानंतर अनेक व्यवसाय सुरु होतील अशी अपेक्षा होती; परंतु ज्या गतीने हॉटेल, रेस्टारुँट सुरु होणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात ते झालेले नाहीत. त्याचा परिणाम आणि जोडीला काही ठिकाणी वाढणारा कोरोना. यामुळे भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.
टोमॅटोच्या कोसळलेल्या दराबाबत ते म्हणाले, दर दीड-दोन वर्षांनी अशी 'सायकल' येते, टोमॅटोचे उत्पादन देशात, राज्यात वाढते. त्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंबंधी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी काही सूचना केल्या आहेत, असे माझ्या वाचनात आले; परंतु त्या अद्याप पणन मंडळापर्यंत आल्या नाहीत.
यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यासाठी आमचा विभाग सर्व बाबी तपासून त्यावर निर्णय घेईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गेल्या दोन वर्षात चांगली एफआरपी दिली असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचलं का?