भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा
सणसर येथील संत तुकाराम महाराज पालखीतळावर मल्टिपर्पज हॉल उभारण्यात आला असून, या वर्षी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हा मल्टिपर्पज हॉल सज्ज झाला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा येथे गुरुवारी (दि. 30 जून) मुक्काम होणार आहे. सणसर येथील पालखी सोहळ्याच्या तळासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा मल्टिपर्पज हॉल उभारण्यात आला आहे.
उर्वरित निधीमधून पालखीतळावर डांबरीकरण करण्यात येणार असून, पालखीतळाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
सणसर येथील पालखीतळावरील या मल्टिपर्पज हॉलसाठी दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर करण्यात आला होता. आता हा हॉल सज्ज झाला आहे. पालखीतळावरील या हॉलमुळे सणसर गावच्या विकासात मोठी भर पडली आहे. या इमारतीमुळे मुक्कामासाठी पालखी सोहळ्यातील प्रमुखांची चांगली व्यवस्था होणार आहे.
याबाबत सणसर येथील सरपंच अॅड. रणजित निंबाळकर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सणसर मुक्कामी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांची चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे. सणसर, भवानीनगर परिसरामध्ये सुमारे 400 ते 500 फिरत्या शौचालयांचे नियोजन करण्यात आले आहे.
वारकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या परिसरात पावसाचे पाणी साचू नये, यासाठी मुरूम टाकून रोलिंग करण्यात येणार आहे. याचबरोबर सणसर ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता करण्यात येणार असून, वीज तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे पालखीतळावर मंडप, डेकोरेशन, सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच पालखीतळावर डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अॅड. निंबाळकर म्हणाले. संबंधित ठेकेदाराने मल्टिपर्पज हॉलचे रंगरंगोटीचे काम अद्याप केलेले नसून ते ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेले नाही. अनेकवेळा मागणी करूनही ठेकेदाराकडून अद्याप काम पूर्ण झालेले नाही