पुणे

शिल्पावरील संकल्पना नामफलक हटविण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पैशातून सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) राजाराम पूल चौकात साकारलेल्या 'गड आला, पण सिंह गेला' या शिल्पाच्या वरील बाजूला माजी नगरसेवकाने लावलेला संकल्पनेचा नामफलक हटविण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राजाराम पूल चौकात पदपथावर विकास निधीतून 70 लाख रुपये खर्चून 'गड आला पण सिंह गेला' या संकल्पनेवर आधारित शिल्प साकारले आहे. या शिल्पाच्या खालच्या बाजूस संकल्पना म्हणून भाजपचे श्रीकांत जगताप यांनी स्वतःसह पक्षातील नेत्यांची नावे असणारा कोरीव फलक लावला आहे. असे असताना शिल्पाच्या वरील बाजूस संकल्पना म्हणून दुसरा एक नामफलक लावला आहे.

शिल्पाच्या वरील बाजूस लावलेला संकल्पनेचा नामफलक काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादीने बुधवारी शिल्पासमोर आंदोलन केले. या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, अभिजित बारवकर, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, ऊर्मिला गुंड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणार्‍या भाजप नेत्यांनी राष्ट्रपुरुषांचे पुतळे आणि स्मारके यावर संकल्पनेच्या नावाखाली नामफलक लावण्याचा सुरू केलेला लाजिरवाणा प्रकार बंद करावा. हे नामफलक आठ दिवसांत हटविले नाही, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT