पुणे

श्री छत्रपतीचे ऊस लागवड धोरण जाहीर; एक जुलैपासून लागवडीस परवानगी

अमृता चौगुले

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा

श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांच्या मार्गदर्शनाने ऊस लागवड धोरण निश्चित करण्यात आले. या वर्षी एक जुलै 2022 पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सभासदांना 31 मार्च 2023 पर्यंत ऊस लागवड करता येणार आहे.

या वर्षीच्या ऊस लागवड धोरणानुसार कोएम 265 या ऊस जातीची एक जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत लागवड करता येईल. 15 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत कोसी 86032 या जातीची तसेच 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कोसी 86032, कोव्हीएसआय 8005 व एमएस 10001 या ऊस जातीची, तसेच 2022-23 गाळप हंगाम चालू झाल्यापासून ते हंगाम संपेपर्यंत वरील सर्व उसाच्या जातींचे खोडवे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कारखान्याने लागवडीखाली येणार्‍या ऊस क्षेत्राचा तोडणी कार्यक्रम जाहीर केला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आडसाली हंगामातील कोसी 86032 व पूर्व हंगामातील लवकर पक्व होणार्‍या कोव्हीएसआय 8005 व एमएस 10001 या उसाच्या जातींचे 70 टक्के लागण नोंद झालेले क्षेत्र व 30 टक्के क्षेत्र कोएम 265 या उसाच्या जातीचे क्षेत्रातील आडसाली हंगाम संपेपर्यंत प्राधान्याने गळितासाठी घेतला जाईल.

आडसाली हंगामातील कोएम 265 या ऊस जातीचे क्षेत्र संपल्यानंतर पूर्व हंगामातील कोसी 86032 या जातीसोबत सुरू हंगामातील लवकर पक्व होणारा ऊस लागण नोंद तारखेनुसार गळितास घेण्यात येईल. कारखान्याने सुचविलेल्या जातीव्यतिरिक्त इतर कोणत्याही ऊस जातींची सभासदांनी लागवड करू नये.

इतर जातीची लागवड केल्यास त्याची नोंदणी, तोडणी व गाळपाची जबाबदारी कारखान्याची राहणार नाही. हार्वेस्टरने ऊस तोडणी करण्याकरता जास्तीत जास्त क्षेत्राची पाच फूट पट्टा पद्धतीने लागवड करावी. ऊस आपल्याच कारखान्यात गळितास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल काटे यांनी केले आहे.

खोडव्याची डिसेंबरपासून तोड

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खोडवा पिकाचे प्रमाण वाढावे व पर्यायाने साखर उतार्‍यामध्ये वाढ होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना मिळावा या उद्देशाने 2022-23 मध्ये राखल्या जाणार्‍या खोडव्याची 15 डिसेंबरपासून 20 टक्केप्रमाणे तोड करण्यात येईल. त्यामध्ये कोसी 86032, एमएस 10001, कोव्हीएसआय 8005, कोएम 265 जातींच्या खोडव्याची क्रमवारीनुसार तोडणी करण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT