पुणे

शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा; निरा परिसरात मशागतीची कामे पूर्ण

अमृता चौगुले

निरा : पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील निरा परिसरातील पिंपरे खुर्द, गुळुंचे, कर्नलवाडी या भागांतील शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरणीकरिता शेतीची मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. जूनचा पंधरवडा संपला तरी पाऊस न पडल्याने निरा परिसरातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

निरा परिसरातील शेतकर्‍यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या आशेवर खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतीची नांगरट करून फणपाळी करून ठेवली. सोबतच खते, बी-बियाण्यांची खरेदीही केली. गत दोन वर्षात चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यंदा जूनचा पंधरवडा सरला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

राख, गुळुंचे, कर्नलवाडी या बहुतांश दुष्काळी भागातील शेतकरी खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन ही पिके घेतात. या परिसरात पर्जन्यमान चांगले झाले तर या पिकांपासून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळते. यावर्षी जूनचा पंधरवडा संपला तरी वातावरणात उष्णता असून पावसाने दडी मारली. त्यामुळे निरा परिसरातील शेतकरी बाजरीची पेरणी करण्याकरिता पावसाची आतुरतेने वाट पाहात असल्याचे पिंपरे खुर्द येथील शेतकरी बाळासाहेब दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

काही परिसरात पाण्याची मुबलकता

निरा परिसरातील पिंपरे खुर्द गावच्या परिसरातून निरा नदी व निरा डावा कालवा वाहत आहे. त्यामुळे या परिसरात उसाची लागण मोठ्या प्रमाणात होते. तसेच गुळुंचे, कर्नलवाडी परिसरातील ज्या शेतकर्‍यांनी निरा नदी व निरा डावा कालव्यावरून उपसा जलसिंचन योजना केली आहे तेच शेतकरी उसाचे पीक घेतात.

गुळुंचे, कर्नलवाडी, राख ही पुरंदर तालुक्यातील गावे अंशतः दुष्काळी आहेत. या भागातील बहुतांश शेतकर्‍यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या परिसरात खरीप हंगामामध्ये बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, जूनचा पंधरवडा संपला तरी पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

                                   – सुधीर निगडे, प्रगतशील शेतकरी, कर्नलवाडी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT