पुणे

शिरूरच्या बेट भागात समाधानकारक पाऊस; पेरणीच्या कामाला येणार वेग

अमृता चौगुले

टाकळी हाजी/ पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बेट भागातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे, वडनेर, आमदाबाद, मलठण, लाखेवाडी, निमगाव दुडे, रावडेवाडी, जांबुत, पिंपरखेड, फाकटे, चांडोह, काठापूर, कवठे येमाई या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. पेरणीसाठीची पूर्वतयारी झालेली असताना पावसाने दांडी मारल्याने चिंतातुर शेतकर्‍यांमध्ये चैतन्य फुलले असून तूर्तास पेरणी करण्यास हा पाऊस समाधानकारक असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

मागच्या पावसात ज्या शेतकर्‍यांनी बाजरीची पेरणी केली होती, त्यांच्या मनातील उगवणीबाबतची भीती दूर झाली आहे. मलठण परिसरात काही भागात पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार होता. तो देखील प्रश्न तात्पुरता सुटल्याचे शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी सांगितले.

कृषी केंद्रांमध्ये गर्दी वाढली
पाऊस झाल्यामुळे कृषी सेवाच्या दुकानांमध्ये बियाणे खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे. अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे आणि पाऊस नसल्यामुळे गावातील बाजारपेठा ओस पडल्या होत्या, तिथे आता गर्दी दिसू लागली आहे. सोयाबीनची पेरणी करताना बीजप्रक्रिया करूनच बियाणे वापरावे, असे आवाहन शिरूरच्या मंडल कृषी अधिकारी योगिता गडाख यांनी केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT