सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा
शहरी-गरीबद्वारे मिळणार्या औषधांची उपलब्धता नसल्याची बातमी पुढारीत प्रसिद्ध झाल्यावर या वृत्ताची दखल घेत आठवडाभरात औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. याबाबत अनेकांनी ऑनलाईन सुद्धा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीमुळे आयुक्तांनी या विषयात लक्ष देताना आठवडाभरात औषधे उपलब्ध होणार असल्याचे तक्रारीवर कळविले आहे.
शहरी गरीब योजनेंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात मोफत औषधे पुरवली जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी पुण्यातील बहुतेक महापालिका रुग्णालयांत औषधे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते. शिवसेना खडकवासलाचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी ऑनलाइन तक्रार करताना सातत्याने पाठपुरावा केला होता.
ऑनलाइन तक्रारीला सकारात्मक प्रतिसाद देताना आयुक्तांनी औषधे उपलब्ध करण्यासाठीचे टेंडर काढण्यात आले असून, या आठवड्यापासून सर्व शहरी -गरीब कार्डधारकांना औषधे उपलब्ध होतील, असे लिखित स्वरूपात दिले आहे. यावर बोलताना महेश पोकळे म्हणाले, 'आपण केलेल्या तक्रारीची आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन शासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतल्याने शहरी-गरीब योजनेतील अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.'
https://youtu.be/YepUS0JEz38