पुणे

विवेक जागवणे हेच ‘पुलं’चे संचित; ज्येष्ठ साहित्यिका गोडबोले यांचे मत

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा; 'पुल हे एकावेळी कमालीचे लोकविलक्षण आणि ग्लोबल जगणारे ठरले. सांस्कृतिक जीवनाबद्दलचा विवेक बाळगणे, जागवणे हे पुलंचे सर्वात मोठे संचित आहे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबतर्फे 'पु. ल. स्मृती महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.

त्याचे उद्घाटन गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी 'पुलंचे संचित' या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, अभिनेत्री मुक्ता बर्वे उपस्थित होते. गोडबोले म्हणाल्या, 'आजही पुलंच्या धाटणीतली व्यक्तिचित्रे आणि प्रवासवर्णने मराठीत पुष्कळ लिहिली जातात.

पुलंनी नकळतपणे महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक कुटुंबाचे वडीलपण किंवा म्होरकेपण भूषवले. पुलंनी मराठी भाषेची सर्व ताकद आणि सर्व सौंदर्यस्थळे सातत्याने लोकांसमोर आणली.' यानंतर पु. ल. आणि सुनीताबाई यांच्यावर आलेल्या 'तप:स्वाध्याय' या ललित निबंधावर आधारित अभिवाचनाचा 'प्रिय भाई..एक कविता हवी होती' हा रंगमंचीय आविष्कार जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर, अमित वझे आणि मुक्ता बर्वे यांनी सादर केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT