पुणे

विनापुरवणी परीक्षेला प्रारंभ; पावणेचार लाखांवर विद्यार्थी सामोरे जाणार परीक्षेला

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या उन्हाळी सत्राची परीक्षा पारंपरिक पद्धतीने आज दि. 23 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यापीठाने उत्तरपत्रिकांतील पाने वाढविण्याचा निर्णय घेऊन पुरवणी सुविधा बंद केली आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूला विद्यार्थ्यांना समास आखता येणार नाही. 3 लाख 78 हजार 643 विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातील अधिकार्‍यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 274 अभ्यासक्रमांच्या परीक्षा 23 एप्रिल ते 13 जूनदरम्यान होणार आहेत.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडणार आहेत, तर जून महिन्यात उर्वरित परीक्षा होणार आहे. परंतु, सर्व परीक्षांचा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर करण्याची तयारी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या परीक्षांची जबाबदारी असणार्‍या प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा तिन्ही जिल्ह्यांतील महत्त्वाच्या महाविद्यालयांत झाल्या आहेत. त्यामध्ये निकाल तातडीने लागण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवीस्तरावरील (कला, वाणिज्य, विज्ञान, विधी) अभ्यासक्रम वगळून पदव्युत्तर स्तरावरील सर्व वर्षांच्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठस्तरावर करण्यात येणार आहे. पदवीस्तरावरील प्रथम वर्षाच्या (कला, वाणिज्य, विज्ञान, विधी) परीक्षांवेळी महाविद्यालयाने स्वत:च्या उत्तरपत्रिका वापराव्यात, विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका वापरू नये तसेच परीक्षेच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेत पुरवणी पद्धत बंद करतानाच उत्तरपत्रिकांतील पाने वाढवून 24 आणि 36 करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना लेखनासाठी पुरेशी पाने उपलब्ध होतील, असे देखील परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेे.

आजपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. काही अपवाद वगळता तिन्ही जिल्ह्यांत प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे. या वर्षापासून पुरवणीशिवाय परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकेपणाने उत्तरे लिहावी लागणार आहेत. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार उजव्या बाजूला विद्यार्थ्यांना समास आखता येणार नाही. लोकसभा मतदानाच्या दिवसाच्या अलिकडे आणि पलिकडे पेपर ठेवण्यात आलेले नाहीत. अशा प्रकारे परीक्षा पार पाडण्यासाठी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT