पुणे

राष्ट्रवादी ‘टार्गेट’, मात्र नेत्यांचा शिवसेनेलाही घरचा आहेर

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा: बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या समर्थनार्थ चाकण (ता. खेड) येथे रविवारी (दि. 26) झालेल्या मेळाव्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, शिवसेना नेत्यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. आपल्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतानाच शिवसेना पक्षश्रेष्ठींनाही खडेबोल सुनावत सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची पुस्तीही जोडली. या मेळाव्यास आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या वेळी म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत जास्त फटका पुणे जिल्ह्यातील शिवसेनेला बसला आहे. जिल्ह्यात 170 कोटींचा निधी एकतर्फी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, आमदारांना वाटपही केला आहे. या निधी वाटपात शिवसेनेला मात्र डावलण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारभाराची आढळराव पाटलांनी भरसभेत पोलखोल केली.

आता आम्ही सहन तरी किती करायचं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माजी आमदार शरद सोनवणे यांनीही शिवसेनेला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, शिवसेनेला नुसतं समर्थन नाही तर आमच्या मनातल्या अडचणीही आता तुम्हाला ऐकाव्या लागतील. मागच्या तीन वर्षात शिवसैनिकांची पाठराखण झाली नसल्याने शिवसैनिकांची भिकार्‍यासारखी अवस्था झाली आहे, अशी खंत शरद सोनवणे यांनी व्यक्त केली.

…आधी 'रोड टेस्ट' होईल, तयार राहा : अहिर
या वेळी आमदार सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला, ते म्हणाले की, शिवसेनेचे बंडखोर गुवाहाटीला गेले आहेत, त्यांची 'प्लोअर टेस्ट' होईल तेव्हा होईल पण त्याआधी त्यांना 'रोड टेस्ट' करावी लागणार आहे. त्यासाठी मुंबई आणि पुण्यात शिवसैनिकांनी तयार राहावे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT