पुणे

राजगडच्या शेतकर्‍यांची नुकसानभरपाई लालफितीचे ग्रहण; विमा कंपनी आणि प्रशासन सुस्त

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : राजगड (वेल्हे) तालुक्यातील शेतकर्‍यांची नुकसानभरपाई लालफितीत अडकल्याने अद्याप एकाही शेतकर्‍याला खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. विमा कंपनी तसेच प्रशासन सुस्त पडल्याने गोरगरीब शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात पिकांची शेतकर्‍यांना भरपाई मिळणार आहे.

याबाबत विमा कंपनी तसेच शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करूनही भरपाई मिळाली नसल्याचे वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील शेतकरी विकास गायखे यांनी सांगितले. याबाबत गायखे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. राजगड तालुक्यात जवळपास शंभर हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे विमा कंपनी व शासकीय यंत्रणेने केले होते. खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना इतर तालुक्यांसह राज्यभर नुकसानभरपाई मिळत असताना राजगड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित का आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजगड तालुक्यातील 140 शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्याची अद्ययावत माहिती मिळाली नसल्याने भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी बँक खात्याची अद्ययावत माहिती दिली आहे, त्यांना भरपाई मिळाण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र दिले आहे.

– श्रीधर चिंचकर, मंडल कृषी अधिकारी, पानशेत

राजगडमधील मोजकेच शेतकरी पात्र

गेल्या खरीप हंगामात तालुक्यातील सात हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी भात व इतर खरीप पिकांचा विमा काढला होता. अवकाळी पावसामुळे भात पिकांचे तोरणा, पानशेत, राजगड भागासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असले तरी नुकसानभरपाईला तालुक्यातील मोजकेच शेतकरी पात्र ठरले आहेत.

98 शेतकर्‍यांच्या तक्रारी दाखल

विमा कंपनीकडे तालुक्यातील 98 भात उत्पादक शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईसाठी तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही एकाही शेतकर्‍याला विमा कंपनीने भरपाई दिली नाही. पीक विमा भरपाईसाठी राज्य सरकारने अनुदान दिले. मात्र, केंद्र सरकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT