पुणे : पुढारी वृत्तसेवा
'महापालिकेने उभारलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची (एसटीपी) शुद्धीकरण क्षमता कमी झाली असून, ही क्षमता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाढवावी,' अशा सूचना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेला दिल्या आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील अधिकार्यांनी 'नमामि गंगा' प्रकल्पांतर्गत गुरुवारी महापालिकेच्या अधिकार्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली.
या बैठकीत जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकार्यांनी महापालिकेकडून उभारलेल्या एसटीपी प्रकल्पाची प्रक्रिया करण्याची क्षमता कमी झाली आहे. या प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी प्रदूषणाबाबत असलेल्या मानकात बसत नाही. शुद्ध केलेल्या पाण्यातील 'सीओडी' तसेच 'बीओडी'चे प्रमाण कमी आढळत आहे.
त्यामुळे भविष्यात नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि या प्रकल्पांची क्षमता पुन्हा वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना महापालिका अधिकार्यांना केल्या. दरम्यान, शहरात सध्या दर दिवशी सुमारे 800 ते 850 एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यातील सुमारे साडेपाचशे एमएलडी पाण्यावरच पालिका प्रक्रिया करते.
त्यामुळे मुठा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळते. हे रोखण्यासाठी नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जपान स्थित जायका कंपनीने केंद्र सरकारमार्फत 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन 11 एसटीपी प्रकल्प आणि मैलापाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.