बावधन : पुढारी वृत्तसेवा: जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्यामुळे शेतामध्ये भाताचे रोप उगवण्यासाठी टाकलेले भाताचे बी जमिनीत रुजावे यासाठी कूपनलिका, विहीर, तलाव जेथून मिळेल तेथून पाणी मिळवून जमिनीत पेरलेले भाताचे बियाणे वाचवण्याचा प्रयत्न मुळशी खोर्यातील शेतकरी करत आहेत. मुळशी तालुक्यामध्ये इंद्रायणी, दोडकी, आंबेमोहर या प्रमुख जातीच्या भात पिकांची लावणी होत असते. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे रोपांसाठी जमिनीत टाकलेले बी पक्ष्यांचे भक्ष्य ठरले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवल्याचे भूगावातील शेतकरी सुभाष निवृत्ती सातपुते यांनी सांगितले.
मुळशी तालुका हा एकेकाळी भाताचे कोठार समजले जायचा. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून सध्या अनेक शेतकर्यांना अत्याधुनिक रोप वाटिकाद्वारे भाताचे रोप तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे; परंतु ज्याकडे पाण्याची सोय आहे, अशाच शेतकर्यांना त्यांचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे सध्या पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असलेल्या 80 टक्के शेतकरीवर्ग अडचणी सापडला आहे. 'सर्व शेतकर्यांनी भाताच्या पिकाचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुढचे आठ दिवस अजून दर पाऊस पडला नाही, तर शेतकर्यांसमोर फार मोठे संकट उभे राहणार आहे. मुळशी धरण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, परंतु यावर्षी पावसाने जास्त ताण दिल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, आभाळाकडे पाहून पावसाची वाट पाहत आहे. घरातील देवांना पाण्यामध्ये ठेवून पावसाचे आवाहन करावे लागेल, असे भुकूम येथील शेतकर्यांनी सांगितले.
हेही वाचा