पुणे

महाराष्ट्राचा मानबिंदू दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड

अमृता चौगुले

राजेंद्र खोमणे

नानगाव : पाचाड (ता. महाड) येथील जिजामाता यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेत व वाड्याची माहिती घेत पावले दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या चित्त दरवाजाकडे पुढेपुढे चालत राहतात. रस्त्यावरून चालताना पुढे सह्याद्रीच्या रांगेतील बलाढ्य, आकाशाला गवसणी घालणारा, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड दिसतो आणि मग ओढ लागते ती किल्ल्यावर जाण्याची.चित्त दरवाजापासून मोठमोठ्या घडीव पायर्‍या चढत आपण किल्ल्यावर जात असतो. दमछाक करणार्‍या पायर्‍या किल्ल्याच्या उंचीचा अंदाज देत असतात.

गडावर चालत जात असताना डाव्या बाजूचा टकमकटोक शेवटपर्यंत आपली साथ सोडत नाही. एकीकडे गडाचा उंच कडा आणि दुसरीकडे खोल दरी आणि टकमकटोक पाहत पाहत आपण गडाच्या मुख्य महादरवाजाजवळ पोहचतो. सुरवातीला अरुंद असा वळण देणारा मार्ग भव्य दरवाजात घेऊन जातो. दरवाजाची बांधणी पाहिल्यावरच समजते किल्ला किती अभेद्य असणार. महादरवाजाचे मोठे बुरुज व कोनाड्यात असलेला दरवाजा शत्रूलादेखील लवकर ताबा मिळवता येणार नाही, असा तयार करण्यात आलेला आहे.

दरवाजातून आत प्रवेश केल्यावर पुन्हा एक छोटीशी वाट व वरपर्यंतच्या पायर्‍या आपल्याला गडावरील हनुमान टाकी व हत्ती तलावापर्यंत नेतात. थोडे पुढे गडाच्या सुरवातीला शिरकाई देवीचे मंदिर लागते. या ठिकाणी शिरकाई देवीचे दर्शन घेत आपण समोर होळीच्या माळावर जातो. होळीच्या माळावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या ठिकाणाहून पुढे गेल्यावर आपणास नगारखाना दिसतो. नगारखान्याच्या समोरच राजसदरेवरील छत्रपती शिवरायांचे सिंहासन दिसते. या सिंहासनावर बसलेल्या स्वरूपात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सदरेच्या पाठीमागे राजवाडा, राणीमहल, धान्यकोठार, अष्टप्रधान मंडळांचे निवासस्थान, खलबतखाना मनोरे, गंगासागर तलाव अशा अनेक वास्तू आपणास पाहावयास मिळतात.

या सर्व वास्तूंच्या समोरच मोठ्या बाजारपेठेचे बांधकाम दिसते. या बाजारपेठेचे आवार पाहता पूर्वी या ठिकाणी किती मोठी लगबग असेल याचा अंदाज येतो. बाजारपेठेतून पुढे जाताना डाव्या बाजूला गडाचे टकमकटोक नजरेस पडते. गडावरील उंच व टोकाची जागा म्हणून प्रसिद्ध आहे. टकमकटोकाजवळ गेल्यावर समोर दिसतात त्या सह्याद्रीच्या मोठमोठ्या व उंचच उंंच रांगा आणि खाली भयानक खोली. टकमकटोकावर उभे राहिल्यावर सह्याद्रीचा वारा अंगाला झोंबतो. पूर्वी अपराध्याला शिक्षा देण्यासाठी त्याचा याच टकमकटोकावरून कडेलोट केला जात असे.

… दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड
पुढे गेल्यावर दगडी तटबंदीच्या दरवाजातून आत गेल्यावर पूर्वाभिमुख जगदीश्वराच्या मंदिरात आपण प्रवेश करतो. मंदिरासमोर मोठा नंदी आहे. जगदीश्वराचे दर्शन घेत आपण पूर्वेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या समाधीचे दर्शन होते. जो दरवाजा ओलांडून आपण समाधिस्थळावर पोहचतो त्याच दरवाजाच्या पायरीवरील एका दगडावर कोरले आहे

"सेवेची ठायी तत्पर हिरोजी इंदोलकर".
ज्यांनी या रायगड किल्ल्याची अभेद्य बांधणी केली त्या हिरोजी इंदोलकर यांना छत्रपती शिवरायांनी विचारले मागा तुम्हाला काय मागाचे ते. आज तुम्ही एक बळकट आणि अभेद्य किल्ला उभारला आहे. तेव्हा हिरोजी इंदोलकर म्हणाले, महाराज मला काही नको. तुम्ही जर म्हणत असताल तर या जगदीश्वराच्या पायरीवर माझे नाव कोरून ठेवतो. कारण जेव्हा तुम्ही दर्शनासाठी जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ आमच्यावर पडेल व त्यातच आम्ही धन्य पाऊ. "काय ते मावळे आणि काय त्यांचा राजा" असे शब्द आपोआपच ती पायरी पाहिल्यावर बाहेर पडतात.

समाधिस्थळावरून बरेचसे पुढे गेल्यानंतर अजूनही काही इमारतींचे अवशेष आढळून येतात. तसेच तलावदेखील आहेत. किल्ल्याच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकाला भवानी कडा असे म्हणतात. कारण त्या ठिकाणी थोडी अवघड वाट खाली उतरून आल्यावर एकसंध दगडात भवानीमातेचे मंदिर आहे. तसेच किल्ल्याच्या पश्चिमेला शेवटच्या टोकाला हिरकणीचा बुरुज असून त्या ठिकाणी तीन तोफा आहेत. त्याच्या बाजूच्या परिसरात तलाव, पाण्याची टाकी व काही बांधकामाचे अवशेष आहेत. गडभ्रमंती केल्यावर वाटते, की म्हणूनच राजांनी हा किल्ला राजधानी करण्याचे योजले असावे.

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू, नैसर्गिक वैशिष्ट्ये यासंबंधीची मालिका…

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT