पुणे

महायुतीचे शक्तिप्रदर्शन : पुण्यातून मोहोळांचा उमेदवारी अर्ज दाखल; फडणवीस यांची उपस्थिती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (दि.25) कोथरूड ते डेक्कन या दरम्यान रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप महायुतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी शहरातील मान्यवर व्यक्ती, ज्येष्ठ नेते यांच्या गाठीभेटींसह विविध भागात पदयात्रा काढून प्रचाराची सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.25) मोहोळ यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सुपूर्त केला. तत्पूर्वी मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले. तसेच, कोथरूडमधील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सकाळी पावणेअकराच्या सुमारास मोहोळ

यांच्या रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीमधील महाविजय रथामधून मोहोळ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी नेते मंडळी पुणेकरांना अभिवादन करत होते.

कोथरूड ते डेक्कनमधील खंडूजीबाबा चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीचे जागोजागी भले मोठे पुष्पहार आणि जेसीबीमधून फुलांची उधळण करून फटाके वाजवत स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये भाजप, मनसे, शिवसेना, रिपाइं, लहुजी सेनेचे झेंडे मोठ्या संख्येने फडकत होते. यामध्ये मनसे आणि रिपाइंच्या झेंड्यांची संख्या लक्षणीय होती. रॅलीमध्ये सहभागी झालेले महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते मोदी व महायुतीच्या जयघोषासह ढोल-ताशा आणि हलगीच्या तालावर ठेका धरत होते.

सभेचे नियोजन फसले

कोथरूडमधील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होणार्‍या रॅलीची सांगता डेक्कनमधील छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेने करण्याचे नियोजन केले होते. महाविजय रॅली साडेनऊ वाजता सुरू होणार होती. मात्र, ती पावणेअकरा वाजता सुरू झाली. ही रॅली डेक्कनमध्ये पोहोचण्यास एक वाजला. त्यातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जळगावला पोहोचायचे होते. त्यामुळे फडणवीस, मोहोळ व इतर मंत्री व प्रमुख नेते कर्वे रस्त्यावरील रसशाळेजवळ रथामधून उतरून गाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यामुळे तेथून डेक्कनपर्यंत रथामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील व शहरातील इतर नेते होते. फडणवीस व इतर वरिष्ठ नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहराध्यक्ष धीरज घाटे व चंद्रकांत पाटील यांचे भाषण झाले.

मोदी विश्वविक्रम करणार : पाटील

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून (2014 पासून) गेल्या दहा वर्षांत देशात एकही दंगल नाही, एकही बॉम्बस्फोट नाही. आता देशात भक्कम सरकार निर्माण करण्यासाठी आम्ही 400 पारचा नारा दिला आहे. जगातील अनेक सत्ताधार्‍यांना दुसर्‍या वेळी सत्तेवर येणे शक्य झाले नाही. नरेंद्र मोदी मात्र तिसर्‍यांदा पंतप्रधान होऊन विश्वविक्रम करणार आहेत. मोदींनी दहा वर्षांत पुण्यासाठी अनेक प्रकल्प दिले आहेत. त्यामुळे पुण्याचा खासदार सहा लाखांनी विजयी करून दिल्लीला पाठवायचा आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही : फडणवीस

पुण्याचे जे ट्रान्सफार्मेशन दिसत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित करायचे आहे. जो काही विकास दिसतोय तो आमच्या काळातील आहे. महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियत ही नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. जनता मोदींच्या पाठीशी असून, राज्यात महायुतीच्या मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली विकासाची यात्रा 2014 मध्ये सुरू झाली आहे. ही यात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे करीन. पुण्यात पुढील पन्नास वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. त्याचा प्रारंभही झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात 50 हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

– मुरलीधर मोहोळ, उमेदवार, महायुती

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT