पुणे

मनमोहक फ्लेमिंगो पक्षी पळसनाथांच्या दारी; पाणीसाठा कमी झाल्याने मुक्त वावर

अमृता चौगुले

प्रवीण नगरे

पळसदेव : पांढरेशुभ्र गुलाबी छटा असलेले पंख, आखूड वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी सध्या इंदापूर तालुक्यातील पळसदेवच्या दारी आले आहेत. तब्बल पाचशेच्या आसपास रोहित पक्षी पळसदेव परिसरात वावरत असून, पक्षी व निसर्गप्रेमींना ही एक पर्वणीच ठरत आहे.

गेल्या हिवाळ्यात गुजरातच्या कच्छच्या रणातून उजनी जलाशयाच्या विविध ठिकाणी हे प्रवासी पक्षी धरण परिसरातील विविध बेटांवर आपला डेरा टाकून होते. सध्या धरणातील पाणी कमी झाल्यामुळे हे पक्षी पाण्यापासून मुक्त झालेल्या भूप्रदेशावर आले आहेत. धरण क्षेत्रातील विविध ठिकाणांहून हे पक्षी बहुसंख्येने पळसदेवच्या पळसनाथ मंदिराभोवती एकवटले आहेत.

उजनी धरणनिर्मितीनंतर जलसमाधी मिळालेल्या पळसनाथ मंदिराजवळच्या उथळ पाण्याच्या काठावर विहार करताना नजरेत भरतात. धरणातील पाण्याचा सातत्याने विसर्ग होत असल्याने पळसनाथ मंदिर परिसर पाण्यापासून मुक्त होत आहे. त्यामुळे या पक्ष्यांना चरण्यासाठी दलदल तयार होत आहे.

शेवाळ, खेकडे व नितळ पाण्यातील मासे व इतर जलचर प्राणी व जलकीटक इत्यादी खाद्य उपलब्ध होत आहे. या कारणामुळे हे पक्षी या ठिकाणी गर्दी करीत आहेत. पावसाला प्रारंभ झाला, की हे पक्षी गटागटाने येथून थेट आपल्या मूळ ठिकाणी उड्डाण घेतात. फ्लेमिंगोच्या संगतीत पाणटिवळांसह विविध प्रकारांचे बदक, चित्रबलाक, मुग्धबलाक, पाणकावळे, काळे व पांढरे कुदळे, शेकाट्या तसेच विविध प्रकारचे बगळे शेकडोंच्या संख्येने हिरवळीवर मुक्त विहार करताना दिसतात.

पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर साकारलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पक्षिवैभवात रोहित पक्ष्यांना मानाचे स्थान आहे. या पक्ष्यांच्या वावरस्थानी त्यांचे वास्तव्य आनंददायी करण्यासाठी आपल्या सर्वांकडून योगदानाची आवश्यकता आहे. नदीपात्रातील वाळू उत्खनन, यांत्रिक बोटी वापर करीत पाणी प्रदूषित करणे व पक्ष्यांची शिकार करणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत.

                      – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षिसंशोधक व पर्यावरण अभ्यासक

हेही वाचा

SCROLL FOR NEXT