पुणे

भाजपने केला वारकर्‍यांचा अपमान : सुनील शेळके

अमृता चौगुले

वडगाव मावळ : श्रीक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम हा भाजप पुरस्कृत भाजप आध्यत्मिक आघाडीचा कार्यक्रम होता, असा आरोप करून या कार्यक्रमात वारकर्‍यांना कुठेही स्थान दिले नाही. फक्त दिखाव्यासाठी त्यांना बोलावून त्यांचाही अपमान केला असल्याची टीका आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत केली.

या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, संजय बाविस्कर, चंद्रकांत दाभाडे, रामदास वाडेकर उपस्थित होते. आमदार शेळके यांनी सांगितले, की प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे अपेक्षित होते. परंतु, भाषण न होण्यामागे व प्रोटोकॉल बदलण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व तुषार भोसले यांनी केले.

तसेच व्यासपीठावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, तुषार भोसले, हभप मारुतीमहाराज कुर्‍हेकर व विश्वस्त नितीनमहाराज मोरे यांनाच बसण्यास जागा दिली; पण लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार, खासदार, नगराध्यक्ष यांची बसण्याची व्यवस्था केली नव्हती. एकप्रकारे व्यासपीठावर बसण्यापासून ते भाषणापर्यंत भाजप नेत्यांनी दुजाभाव केला असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला.

वास्तविक विश्वस्तांना आम्ही वारंवार विचारत होतो, की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलमध्ये नावे दिली का? असे कार्यक्रमपूर्वी विचारले असता त्यांनी नावे दिली असल्याचे सांगितले. मग प्रोटोकॉल कुणी बदलला, पंतप्रधान एवढ्या छोट्या गोष्टीत लक्ष घालणार नाहीत. हा संपूर्ण प्रोटोकॉल बदलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि तुषार भोसले यांनीच केले असा आरोप शेळके यांनी केला.

दोन कोटी खर्च देवस्थानचा की भाजपचा?
या कार्यक्रमासाठी सुमारे 2 कोटींचा खर्च झाला आहे. वारकरी संप्रदायाच्या या कार्यक्रमात राजकारण करणार्‍या भाजपला पाठीशी घालणार्‍या देवस्थानने हा खर्च केला की भाजपने केला, असाही सवाल आमदार शेळके यांनी या वेळी केला. हा कार्यक्रम भाजप पुरस्कृतच होता हे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोपही आमदार शेळके यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT