पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: हवामानातील सतत होणार्या बदलांचा परिणाम केसर आंब्याच्या उत्पादनावर झाल्याने या वर्षी केसरचे उत्पादन घटले आहे. त्यात केशर उशिरा बाजारात आल्याने उत्पन्नदेखील घटले आहे. या वर्षी सुरुवातीला केशर आंबा 140 रुपये किलो असलेला दर आता 60 रुपयांवर आला आहे.
.सध्या आंब्याच्या हंगामाची अखेर असून पावसाळा सुरू झाला आहे. तुरळक का होईना पण पावसाने हजेरी लावल्याने दरही कमी झाले आहेत. हापूस, पायरीपेक्षा वेगळी चव असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी असते. महाराष्ट्र केसर, गुजरात केसर, झारखंड केसर, असे प्रकार केसर आंब्यात येतात. महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदलत आहे. त्याचा विपरीत परिणाम केसरच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पन्न देखील अल्प मिळत आहे.
इतर हंगामात महाराष्ट्र केसर मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो. परदेशात पाठवण्यासाठी देखील केसरला मोठी मागणी असते. यंदा उत्पादन घातल्याने शेतकरी आणि व्यापारी यांना फटका बसला आहे. अपेक्षित माल न आल्याने हंगामाचा शेवट कडू झाला आहे.