पुणे

बँक कर्जाच्या अटी शिथिल करा; इथेनॉल प्रकल्पांबाबत केंद्र सरकारला साखर उद्योगाचे साकडे

अमृता चौगुले

पुणे  पुढारी वृत्तसेवा

'इथेनॉलच्या नव्या प्रकल्पांसाठी बँकांकडून कर्ज मिळविण्यात अडचणी येत असून, त्याच्या अटी-शर्ती शिथिल कराव्यात आणि कर्जासाठी सुविधा व सवलती द्याव्यात,' अशी मागणी साखर उद्योगाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली. साखर संकुल येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यअधिकारी संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते. दांडेगावकर म्हणाले, 'मागील पाच वर्षे साखर कारखानदारीसाठी अडचणीची गेली आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात साखर विक्री करण्यामुळे कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात दिसत होते. दुष्काळी स्थितीमुळे 150 ते 160 दिवसांऐवजी कारखाने 70 ते 90 दिवसच चालल्याने कारखाने अडचणीत आले.

मात्र, सुदैवाने मागील दोन वर्षे साखरेला क्विंटलला निर्धारित केलेल्या 3100 रुपयांपेक्षा अधिक भाव राहिले. मळी, बगॅस आदींच्या विक्रीद्वारे मिळणार्‍या रकमेमुळे कारखाने अडचणीतून स्थिरावले. इथेनॉल, डिस्टलरी, हायड्रोजन निर्मिती प्रकल्पांसाठी कारखाने पुढे सरसावत असताना बँक कर्जांसाठी विविध अटींमुळे अडचणी येत आहेत. याबाबतचे सादरीकरण साखर उद्योगाच्या वतीने केंद्र सरकारला करीत अडचणी सोडविण्याची मागणी करण्यात आली

ऊस तोडणीसाठी कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस अवघड होत आहे. मार्च ते एप्रिल महिन्यातच पन्नास टक्के कामगार उसाच्या फडातून तोडणी तशीच ठेवून निघून गेले. पूर्वी कारखान्याचा पट्टा पडल्याशिवाय कामगार जात नसत. चालू वर्षी अवघड स्थिती होऊन उभ्या उसाचा प्रश्न निर्माण झाला असून पुढील पाच ते सात वर्षांत ऊस तोडणी कामगार मिळणे अवघड होईल. त्यामुळे व्हीएसआयने उसासाठी हार्वेस्टर, रोबोट तयार करावा, अशी अपेक्षा दांडेगावकर यांनी व्यक्त केली.

शनिवारी, रविवारी साखर परिषद

राज्यस्तरीय साखर परिषद-2022 ही मांजरी येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात येत्या शनिवार व रविवारी (दि.4 व 5) होत आहे. परिषदेच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले असून परिषदेचे अध्यक्षस्थान 'व्हीएसआय'चे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे भूषविणार आहेत. परिषदेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. त्यानंतर पवार यांच्या साखर उद्योगातील योगदानावरील 'आधारस्तंभ' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT