पुणे

फ्लेमिंगोंचा परतीचा प्रवास सुरू

अमृता चौगुले

प्रवीण नगरे

पळसदेव : परदेशी आणि परप्रांतातील पक्ष्यांच्या थव्यांनी पळसदेव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाचा काठ बहरून आला आहे.
पळसदेव व काळेवाडी परिसरातील विस्तृत हिरव्या गालिच्यावर नजाकतदार रेहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांसह विविध प्रकारचे देशी-विदेशी पक्षी विहारताना मनमोहक दृश्य पक्षिनिरीक्षक व निसर्गभ्रमण करणार्‍यांना भुरळ घालत आहे. पळसदेव परिसरातील पाणीपातळीला कमालीची ओहोटी लागली आहे. धरणनिर्मितीनंतर येथील नदीकाठावरील मंदिराला जलसमाधी मिळाली आहे.

मात्र, आता बुडालेले या मंदिराचे निम्म्याहून अधिक भाग दिसत असले, तरी मंदिर पाण्यात खूप दूरवर आहे. या मंदिराच्या सभोवतालच्या भागातील दलदल, चिखल आणि पाण्यातील खांद्यावर ताव मारण्यासाठी रोहित पक्ष्यांनी मोठी गर्दी केली आहे. रोहित पक्ष्यांचे थवे या परिसरात सध्या वास्तव्याला आहेत. या पक्ष्यांचे उघडेचोच, चित्रबलाक, शेकाट्या, पाणटिवाळे, काळे व पांढरे कुदळे व स्थानिक बदकांचे थवे या परिसरात मनसोक्त विहार करताना दिसत आहेत. रोहित पक्षी जरी पळसदेव परिसरात एकवटले असले, तरीही कोंडारचिंचोळी, टाकळी, डिकसळ, केतूर आदी ठिकाणच्या विस्तृत पाणपृषठावर अद्याप आढळत असल्याचे पक्षिमित्र विशाल बनसुडे यांनी सांगितले.

साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये धरणातील पाणीपातळी खालावते. त्यानंतर दलदल असलेल्या भागात पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणावर चराऊ क्षेत्र उपलब्ध होते. या ठिकाणच्या खाद्यांवर उदरनिर्वाह करण्यासाठी विविध प्रजातींचे पक्षी मोठ्या संख्येने तिथे येतात. त्यामुळे तिथे पक्ष्यांचा वावर वाढलेला असतो. पुढील
15 दिवसांत हे पक्षी आपल्या मूळस्थानाकडे परतण्यासाठी उड्डाण घेतील, असा अंदाज आहे.

                      – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

हेही वाचा

SCROLL FOR NEXT