पुणे

प्रकल्पग्रस्त जमीन वाटपाचे संकलन सुरू

अमृता चौगुले

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: कोयना प्रकल्पग्रस्तांना दुबार व अतिरिक्त वाटप तसेच गैर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप घोटाळ्याच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना वाटप जमिनीबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अयोग्य भूसंपादन संघर्ष समितीने केली होती.

याबाबत दै. 'पुढारी'ने सातत्याने प्रकाश टाकला. यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व धरण प्रकल्पग्रस्तांबाबत माहिती संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. या बाबीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

पाटील यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनीबाबत प्रशासनाने माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु अद्यापपर्यंत कुणालाही नोटीस पाठविलेली नाही. शिरूर तालुक्यात चासकमान व इतर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यात आले.

गुंजवणी, भामा आसखेड, टेमघर, कळमोडी, थिटेवाडी, निरा देवघर, आरळा, कोमोडी, मळवंडी, ठुले आदी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनदेखील शिरूर तालुक्यात करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यात सर्रास चुकीची स्लॅब आकारणी करून मूळ शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या गेल्या आणि बारमाही पाणी मात्र मिळाले नाही. तसेच बोगस प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप झाल्याचे सातत्याने आरोप होत आहेत.

त्यामुळेच आता मूळ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची नावे, त्यांच्या कुटुंबातील संख्या, त्यांना मिळालेल्या जमिनीचा गट नंबर, मिळालेले क्षेत्र,
मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम याची माहिती संकलित होणार आहे. ही माहिती संकलित झाल्यास
बोगस प्रकल्पग्रस्त शोधण्यास मदत होणार असल्याचे भूसंपादन संघर्ष समितीचे डॉ. धनंजय खेडकर
यांनी सांगितले.

https://youtu.be/7KwsutS10qQ

SCROLL FOR NEXT