हडपसर : पुढारी वृत्तसेवा
हडपसर औद्योगिक वसाहत येथे पाण्याच्या टँकर भरून देण्यासाठी महापालिकेने पॉइंट उपलब्ध करून दिलेले आहेत. या पॉइंटमधून लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे. एकीकडे वाड्या-वस्त्या तहानलेल्या असताना महापालिकेचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत महापालिकेने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. हडपसर उपनगरातील वाड्या-वस्त्या आजही तहानलेल्या आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, होळकरवाडी, हांडेवाडी, मंतरवाडी या भागांत तीव्र पाणीटंचाई आहे.
येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होत नाहीत. शहरातील अनेक भागांत आजही पाणीटंचाई जाणवते. असे असताना महापालिकेने पाण्याच्या टँकरसाठी उपलब्ध करून दिलेल्या पॉइंटमधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याची नासाडी थांबवणे गरजेचे आहे. महापालिकेच्या या आंधळ्या कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
त्याचबरोबर महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. महापालिकेच्या सक्षम अधिकार्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे देत आहोत.
पाण्याची टंचाई असताना पालिकेचे प्रशासन काय करते असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला,पालिकेचे मैदान असलेल्या ठिकाणी पाणीच नसल्याने गैरसोय होत आहे. व यामुळेच पाण्याअभावी नागरीकांचे हाल सुरुच आहे.तरी पालिका प्रशासन बघ्याची भुमिका घेते.