पुणे

पृथ्वी बहुनाशाच्या उंबरठ्यावर : ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांचा दावा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे पृथ्वी बहुनाशाच्या अगदी जवळ आली आहे. आजवर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा पाच वेळा बहुनाश झाला. मात्र केवळ 5 टक्के सजीव सृष्टीपासून पुन्हा ती बहरली. पण या वेळी पृथ्वीचा शंभर टक्के बहुनाश अटळ आहे, हा माझा नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांचा दावा असल्याचे मत ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी केला. भांडारकर संस्थेच्या ओपन थिएटरमध्ये प्रा. महाजन यांच्या हस्ते दोन निसर्गावरील पुस्तकांचे प्रकाशन झाले, या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, जीवसृष्टी उत्पन्न झाल्यापासून आजवर पाच वेळा तिचा विनाश झाला. मात्र, ती पुन्हा निर्माण झाली. आता सहावा विनाश जवळ आला आहे. आम्हा शास्त्रज्ञांच्या मते सहावा विनाश टाळता येणारा नाही. तापमान वाढीवर संयुक्तराष्ट्र संघात फक्त तू-तू-मै-मै इतकेच होते. यावर ठोस उपाय करण्यास आपण कमी पडल्याने हे संकट जवळ आले आहे.

झाडे वाचली तरच…

प्रा. महाजन म्हणाले, लहान मुलांना झाडे लावायला सांगतात. पण, त्यांना झाडं लावण्यापेक्षा ती वाचवायची कशी, हे शिकवले जात नाही. तेच प्रशिक्षण गरजेचे आहे. झाडे वाचली तर आपण वाचू शकतो.

विषाणूंचा प्रभाव

सजीवांमध्ये अकरा लक्षणे असतात. त्यांना जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, हालचाल करावी लागते. मात्र विषाणूंमध्ये सात लक्षणे गायब आहेत. त्यांना हवा, पाणी, अन्न लागत नाही. अशाही स्थितीत ते जगतात, असेही प्रा. महाजन यांनी सांगितले.

चिंच भारतीय वृक्ष

प्रा. महाजन यांनी सांगितले की, चिंच हा वृक्ष आफ्रिकेतील असल्याचा दावा जगातील सर्वंच शास्त्रज्ञ करतात. पण मी शोधून काढले आहे की, चिंच हा पूर्णतः भारतीय वृक्ष आहे. लवकरच मी नेचर जर्नलमध्ये यावर शोधनिबंध प्रसिद्ध करणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT