पुणे

पूर्व हवेलीत अनिश्चित गट रचनेमुळे नाराजीचा सूर

अमृता चौगुले

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेची गट संख्या 75 ने वाढून 82, तर तालुका पंचायतीत 150 वरून 164 गण अस्तित्वात आले. मात्र, हवेली तालुक्यातील 23 गावे पुणे महानगरपालिकेला जोडल्याने हवेली फक्त 6 शिलेदार जिल्हा परिषदेत जाणार असल्याने जिल्हा परिषदेवरील हवेलीचा राजकीय दबदबा कमी झाला आहे. आगामी जिल्हा परिषदेत पूर्व हवेली तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट अस्तित्वात आले आहेत.

या गट रचनेत मोठी मोडतोड झाल्याने इच्छुकांत नाराजी आहे. तालुक्यात तब्बल 7 गट व 14 पंचायत समिती गणांची संख्या कमी झाली आहे. पूर्व हवेली तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट कायम राहिले आहेत. शिरूर- हवेली मतदारसंघाला जोडलेल्या मतदारसंघात पूर्वीप्रमाणे 5 जिल्हा परिषदेचे गट अस्तित्वात आले आहेत.

मात्र, या प्रारूप गट रचनेत पूर्वी झालेली कोणतीच रचना गृहीत न धरता नव्या पद्धतीने गट रचना करण्यात आल्याने जिल्हा परिषदेचे पूर्वीचे गट पूर्णपणे बदलल्याने नव्या बदलत्या गटांमुळे निवडणुकीला सामोरे कसे जायचे, असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. या गट रचनेवरून हरकती होऊन न्यायालयापर्यंत रचनेवरून दाद मागण्याचा, घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. अनेक कसलेले पहिलवान या रचनेमुळे गारद झाले आहेत.

पूर्व हवेली तालुक्यात 5 जिल्हा परिषद गटात शिरूर – हवेली मतदारसंघातील 38 गावे जोडण्यात आली आहे. तर, पुरंदर -हवेली मतदारसंघातील 1 गाव, वडगाशेरी मतदारसंघात 3 गावांचा सामावेश या गटांत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक शिरूर -हवेली मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

शिरूर-हवेली मतदारसंघातील गावे एकमेकांशी जोडल्याने नवीन समीकरणे जुळवून इच्छुकांना या ठिकाणी पेरणी करावी लागणार आहे. या निवडणुकांची प्रारूप प्रभाग रचना तयार झाली असली, तरी या ठिकाणी काही गावे मिळून नगरपरिषद व नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनापुढे असल्याने पूर्व हवेलीकरांची गट रचनेआधीच आकांक्षा बेसुर झाली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT