पुणे: पुढारी वृत्तसेवा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पूर्णतः कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार आहे. शेतकर्यांना अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. कृषी दिनापासून (1 जुलै) ही रक्कम शेतकर्यांना देण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.22) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रोत्साहनपर लाभावर शिक्कामोर्तब झाले आहे.
याबाबत जिल्हानिहाय पात्र शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सहकार आयुक्तालयात सुरू आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांकडूनही या बाबतची माहिती घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सहकार आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. शासनाचा या बाबतचा आदेश आल्यानंतर तत्काळ दोन दिवसांत याद्या एकत्रित करून मंत्रालयात पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार एकूण किती रक्कम शेतकर्यांना मिळणार, हेसुद्धा स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रोत्साहनपर लाभामध्ये प्रामुख्याने 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकर्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
हेही वाचा