पुणे

पुण्यासाठी 7.25 टीएमसी पाणी राखून ठेवा : सजग नागरिक मंच आक्रमक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी खडकवासला धरणसाखळीत 5.25 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लागणार असून, धरणसाठ्यातील सव्वासात टीएमसी पाणी राखून ठेवावे, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सोमवारी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मतदान पार पडल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरू होईल, अशी लोकांमध्ये भीती आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

खडकवासला धरणसाखळीत सध्या 9.37 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. पुणे शहराला दरमहा खडकवासला धरणातून 1.6 टीएमसी पाणी पुरविले जाते. त्यानुसार 31 जुलैपर्यंत पुणे शहराची पाण्याची गरज 5.25 टीएमसी एवढी आहे. सध्याचा कडक उन्हाळा लक्षात घेतल्यास, पुढील तीन महिन्यांत धरणातील पाणीसाठ्यातून किमान 1.25-1.5 टीएमसी पाण्याचे बाष्पिभवन होईल. जून महिन्याच्या अखेरीला पालखी सोहळ्यासाठी किमान अर्धा टीएमसी पाणी कालव्यातून सोडावे लागेल. पाण्याची ही आवश्यकता लक्षात घेता, 31 जुलैपर्यंत किमान 7.25 टीएमसी पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे, असे वेलणकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, सध्या शेतीसाठी सिंचनाचे सुरू असलेले उन्हाळी आवर्तन आवरते घेण्याची गरज आहे. कारण परत मेअखेर दौंडसह काही गावांना पिण्यासाठी कालव्यातून पाणी द्यावे लागेल. पुणे हे देशातील पहिले शहर आहे की जे महिन्याला अर्धा टीएमसी सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीला पुनर्वापरासाठी देत आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल ही भीती अनाठायी आहे.

पुण्यात पाणीकपात नाही

जलसंपदा विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे शेतीच्या सिंचनासाठी एप्रिलअखेरपर्यंत कालव्यातून पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीला सलग 58 दिवस पाणीपुरवठा केला जाईल. काही कालावधीनंतर पुन्हा ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी पुरविण्याचे नियोजनही केले आहे. त्या वेळी मात्र नियोजन नीट न झाल्यास त्याचा फटका पुण्याला बसू शकतो, याकडे त्या बातमीत लक्ष वेधले होते. राज्यात पाणीटंचाईचे संकट असून, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या महानगरांत पाणीकपात सुरू झाल्याचे त्या वेळी पुढारीने वृत्तात म्हटले होते. जलसंपदा विभागाने नियोजन केल्याने पुण्यात पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार नसल्याचे त्या वृत्तात पुढारीने नमूद केले होते.

'पुढारी'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असून, पुणे शहराला पिण्यासाठी 15 जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवण्यात येत असल्याचे
वृत्त दै. 'पुढारी'ने 29 मार्च रोजी दिले होते. पुणेकरांची मागणी
31 जुलैपर्यंतचे पाणी आरक्षित ठेवण्याची आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT