पुणे

पुण्यातून पालखी सोहळा उत्साहात मार्गस्थ

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दोन दिवस वारकर्‍यांच्या सेवेत रमलेल्या पुणेकरांचा निरोप घेत शुक्रवारी सकाळी पुढील प्रवासासाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अनुक्रमे सासवड आणि लोणी काळभोरच्या मुक्कामी पोहचला.
भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरातून सकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसरकडे मार्गस्थ झाली.

प्रथम माउलींच्या पालखी सोहळ्याने हडपसरमार्गे दिवे घाटाच्या दिशेने सासवडकडे, तर तुकोबांच्या पालखी सोहळ्याने हडपसरमार्गे लोणी काळभोरच्या दिशेने प्रयाण केले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साडेआठ वाजता मगरपट्टा चौकात पोहचला. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांनी ठिकठिकाणी उभे राहून दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यास गर्दी केली होती.

पुण्यातील अनेक तरुण, ज्येष्ठ दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील भरपावसात पालखी सोहळ्यात काही अंतर चालून वारीत सहभागी झाले होते. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. अनेक जण लहानग्यांसह सहकुटुंब वारीत सहभागी झाले होते.
माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी दिवे घाटाची अवघड चढण आव्हानात्मक असते. शिवाय, चालण्याचा पल्लाही वारी मार्गावरील सर्वांत अधिक चालीचा असतो. मात्र, हरिनामाचा आणि माउलींच्या नावाचा जयघोष करीत लक्षावधी भाविकांनी ही चढण लीलया पार केली.

पालखी सोहळ्यासोबत चालले पुणेकर
व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, अधिकारी, आयटीयन्स अशा विविध क्षेत्रांत काम करणारे पुणेकर पुण्यातून सकाळीच निघालेल्या दोन्ही पालखी सोहळ्यांसोबत काही अंतर चालले. काही जण हडपसरपर्यंत, तर काही जण माउलींच्या सोहळ्यात दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यासोबत चालत गेले. 'माउली माउली'चा जयघोष करीत उत्साहपूर्ण वातावरणात मार्गक्रमण केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT