पुणे

पुण्यातून धावणार 530 बस; पंढरपूर वारीसाठी एसटी प्रशासन सज्ज

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर यात्रेसाठी एसटीच्या पुणे विभागातून यंदा 530 गाड्या वारकर्‍यांना सेवा पुरविणार आहेत. गेल्या तीन-चार वर्षांतील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत पंढरपूरची वारी झालेली नाही. यंदा शासनाकडून वारीसाठी परवानगी मिळाल्यामुळे सर्वच स्तरातील नागरिक या वारीच्या आनंददायी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर एसटीने यंदा दरवर्षीपेक्षा जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणार्‍या वारकर्‍यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. पंढरपूर वारीसाठी दरवर्षी राज्यभरातून एसटीच्या तब्बल 4 हजार गाड्या धावतात. यंदा राज्यभरातून साडे चार हजार गाड्या सोडल्या जातील.

वारकर्‍यांसाठी ग्रुप बुकिंग व्यवस्था

एसटी विभागाकडून यंदा वारकर्‍यांसाठी ग्रुप बुकिंगने गाडी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांच्या ग्रुपला स्वस्त दरात एसटीची गाडी बुक करता येणार आहे. ही गाडी वारकर्‍यांना त्यांच्या ठिकाणापासून पंढरपूरला नेऊन पुन्हा त्यांच्या निश्चित ठिकाणी सोडेल, असे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी सांगितले.

सोडण्यात येणार्‍या गाड्या

कोरोना काळापूर्वीच्या एसटी गाड्यांची संख्या – 430
यंदा (2022) साठी गाडी संख्या – 530
पुणे विभागातील डेपो – 13
विभागातील एकूण गाड्या – सुमारे 1 हजार

हेही वाचा

SCROLL FOR NEXT